Manish Jadhav
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी गोव्यात मोठी गर्दी केली आहे.
गोव्याचं निसर्ग सौंदर्य जस पर्यटकांना मोहिनी घालतं तशीच इथली गोवन संस्कृतीही लुभावते. गोव्यात अनेक फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यापैकीच एक कार्निव्हल फेस्टिव्हल आहे.
गोवा कार्निव्हल हा गोव्यामधील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा आहे. पोर्तुगीज राजवटीत सुरुवात झालेला हा उत्सव आजही जल्लोषात साजरा होतो. यंदाचा कार्निव्हल फेस्टिव्हल 28 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
कार्निव्हल फेस्टिव्हल हा ख्रिश्चन परंपरेशी निगडित असला, तरी सर्व धर्माचे आणि समुदायाचे लोक यात सहभागी होतात.
यंदाचा 'किंग मोमो' म्हणून क्लीव्हन मॅथ्यू फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. कार्निलव्हसाठी प्रत्येक वर्षी 'किंग मोमो' या काल्पनिक पात्राची निवड केली जाते, जो या उत्सवाचा प्रमुख असतो.
गोवा कार्निव्हल हा नेत्रदीपक परेड, उत्साही संगीत, पारंपरिक नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेला एक भव्य उत्सव आहे. परेड 1 मार्चपासून विविध ठिकाणी आयोजित केली जाणार आहे.
कार्निव्हल दरम्यान गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर आणि शहरांमध्ये विविध संगीत आणि नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात.
गोवा कार्निव्हलचा उगम हा रोमन कॅथोलिक परंपरेशी संबंधित असून, पोर्तुगीज भारतात आल्यानंतर कार्निव्हल गोव्यात रुजला.
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो कार्निव्हल हा जगातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध कार्निव्हल मानला जातो. रिओच्याच धर्तीवर गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलकडे बघितलं जातं. हा सोहळा सण 18व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी गोव्यात आणला.
गोव्यातील पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा या शहरांमध्ये भव्य परेडचं आयोजन केलं जातं. यामध्ये स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.