Ganeshprasad Gogate
गोव्याच्या ईशान्य सीमेकडे 60 किलोमीटर वाहनाने गेल्यास दीड- पावणेदोन तासांच्या अंतरावर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान आहे.
त्याच्या पलीकडे गोवा- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग आहे. त्या बाजूनेही गोव्यात प्रवेश करून जंगलात जाता येते.
महावीर अभयारण्याने 240 कि.मी.चा प्रदेश व्यापलेला आहे. पश्चिम घाटाच्या सुंदर वळणांनी दऱ्याखोऱ्याचे दर्शन घेत या घनदाट अभयारण्यातून भटकंती करण्याचा थरार ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे.
पक्षी निरीक्षकांसाठी तर हे नंदनवनच म्हणावे लागेल. गोव्याची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या विविध वनस्पती, अनेक प्रकारची फुले, पशू-पक्षी यांच्या शिवाय या जंगलात अनेक भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळेही आहेत.
इथून 13 कि.मी. अंतरावर तांबडी सुर्ल हे गाव आहे, तिथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. अत्यंत रमणीय असे हे स्थळ आहे.
महावीर अभयारण्य आणि मोल्याचे जंगल एकमेकाला जोडलेलीच आहेत. सौंदर्याचे जागतिक मानक असलेला दूधसागर धबधबा मोल्याच्या जंगलात आहे. कुळे गावातून एक तासाच्या अंतरावर असलेल्या दूधसागर धबधब्याला जायला कुळ्यातूनच भाड्याची वाहने करून जावे लागते.