गोमन्तक डिजिटल टीम
यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता असून २०२४ मध्ये प्रथमच सरासरी तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज युरोपिय हवामान संस्था ‘कोपर्निकस’ने वर्तविला आहे.
१९९१ ते २०२० या काळातील जागतिक सरासरी तापमानाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान जागतिक सरासरी तापमान ०.७२ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविले गेले
२०२३ च्या तुलनेत तापमान ०.१४ अंश सेल्सिअसने अधिक होते. त्यामुळे, २०२४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरेल, हे आता जवळपास निश्चित आहे.
यापूर्वी २०२३ सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. या वर्षी जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.४८ अंश सेल्सिअस अधिक होते, असेही ‘कोपर्निकस’ने म्हटले आहे.
यंदाचा नोव्हेंबर महिना आतापर्यंतच्या नोंदीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण नोव्हेंबर ठरला. या महिन्यात पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान १४.१० अंश सेल्सिअस होते.
जागतिक तापमान दीड अंश सेल्सिअसने अधिक असण्याचा हा गेल्या १७ महिन्यांपैकी १६ वा महिना आहे.
यंदाचा नोंव्हेंबर १९०१ पासूनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उष्ण नोव्हेंबर महिना ठरला. या महिन्यात कमाल सरासरी तापमान २९.३७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
यंदाच्या नोव्हेंबरमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमानही या महिन्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक ठरले. २०२३ मधील नोव्हेंबरच्या तुलनेत ते केवळ ०.१४ अंश सेल्सिअसने कमी होते.