Manish Jadhav
इ.स. 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान जिंजी किल्ला जिंकला. विजापूरच्या आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून महाराजांनी येथे मराठ्यांचे भक्कम ठाणे निर्माण केले.
जिंजी किल्ला हा केवळ एका डोंगरावर नसून 'राजगिरी', 'कृष्णगिरी' आणि 'चंद्रायनदुर्ग' या तीन टेकड्यांवर पसरलेला आहे. या तिन्ही टेकड्यांना जोडणारी 8 किमी लांब तटबंदी या किल्ल्याला अतिशय अभेद्य बनवते.
जेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला, तेव्हा त्यांनी जिंजी किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले. तब्बल 8 वर्षे राजाराम महाराजांनी येथूनच स्वराज्य सांभाळले आणि मुघलांशी संघर्ष केला.
मुघल सम्राट औरंगजेबाचा सेनापती झुल्फिकार खान याने जिंजी किल्ल्याला तब्बल 8 वर्षे (1690 ते 1698) वेढा घातला होता. हा जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या वेढ्यांपैकी एक मानला जातो.
जिंजीच्या वेढ्यादरम्यान सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी आपल्या गनिमी काव्याने मुघल सैन्याला सळो की पळो करुन सोडले होते. त्यांच्या पराक्रमामुळेच राजाराम महाराज या वेढ्यातून सुखरुप बाहेर पडू शकले.
किल्ल्यावर सात मजली 'कल्याण महाल', धान्य कोठारे, भव्य मंदिर आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज आहेत. येथील पाणीपुरवठा व्यवस्था इतकी प्रगत होती की आजही त्याचे कौतुक केले जाते.
ब्रिटिशांनी या किल्ल्याची रचना आणि अभेद्यता पाहून याला 'Troy of the East' अशी उपमा दिली. अनेक सत्तांनी या किल्ल्यावर राज्य केले, पण कोणालाही हा किल्ला सहजासहजी जिंकता आला नाही.
आज जिंजी किल्ला हा भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असून तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मराठ्यांच्या इतिहासातील 'शौर्य आणि संयमाचे' प्रतीक म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते.