Manish Jadhav
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेला हा किल्ला ताम्हिणी घाटाचे रक्षण करण्यासाठी आणि कोकणातून घाटावर येणाऱ्या व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.
घनगड हा सुमारे 300 वर्षांहून अधिक जुना किल्ला आहे. 17व्या शतकात हा किल्ला कोळी राजांच्या ताब्यात होता, त्यानंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आला आणि पुढे 1818 मध्ये ब्रिटिशांनी तो जिंकला.
या किल्ल्याचे नाव 'घनगड' पडण्यामागे त्याचे घनदाट जंगल आणि किल्ल्याच्या सभोवतालचा कठीण पाषाण ही प्रमुख कारणे आहेत. हा किल्ला एका मोठ्या सुळक्यासारखा दिसतो.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्यावरील दगडी कोरीव काम आजही सुस्थितीत आहे. गडावर चढताना वाटेत एक मोठी नैसर्गिक गुहा लागते, जिथे ट्रेकर्स विश्रांती घेऊ शकतात.
काही वर्षांपूर्वी गडावर जाण्यासाठी एक कठीण कातळ टप्पा पार करावा लागत असे. मात्र, आता शिवदुर्ग मित्र आणि दुर्गप्रेमींच्या प्रयत्नांमुळे तिथे लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे, ज्यामुळे चढाई सोपी झाली आहे.
गडाच्या माथ्यावर जुन्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच पिण्याच्या पाण्याचे खडकात कोरलेले टाके असून, वर्षभर यातील पाणी थंड आणि स्वच्छ असते.
गडाच्या माथ्यावरुन सुधागड, कोरीगड, मुळशी धरण आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचा विहंगम नजारा दिसतो. पावसाळ्यात हा परिसर ढगांनी वेढलेला असतो.
घनगड ट्रेकिंगसाठी 'सोप्या' श्रेणीत मोडतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात (जून ते फेब्रुवारी) येथे भेट देणे सर्वात आनंददायी असते. लोणावळ्यापासून तानाजी नगर किंवा भांबुर्डे मार्गे येथे सहज पोहोचता येते.