Pranali Kodre
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने 2 मार्च रोजी त्याला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केली असल्याचे पोस्टमधून सांगितले आहे.
गंभीरच्या या पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गंभीरने खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता.
त्यानंतर गंभीर 2019 साली पूर्व दिल्लीतून भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूकही लढला आणि जिंकलाही.
मात्र आता 2024 लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच तो त्याच्या राजकीय कामकाजातून मुक्त झाला आहे. दरम्यान, त्याच्या या पोस्टमुळे अशी चर्चा सुरू झाली आहे की तो आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही.
गंभीरने त्याच्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे की त्याला क्रिकेटमधील कमिटमेंट्सवर अधिक लक्ष द्यायचे असल्याने त्याला राजकीय कर्तव्यातून मुक्त केले जावे अशी विनंती त्याने केली आहे.
दरम्यान, त्याच्या या पोस्टमधून हे स्पष्ट झालेले नाही की त्याने राजकारण क्षेत्र सोडले आहे की काही काळापूरती विश्रांती घेतली आहे.
गंभीर भारताकडून अनेकवर्षे क्रिकेट खेळला असून तो आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेतही दिसला आहे.
आता गंभीर आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.