Sameer Panditrao
इजिप्तची राजधानी कैरोजवळ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ४५०० वर्षे जुने सूर्यमंदिर सापडले आहे.
इजिप्तच्या इतिहासातील पाचव्या राजवंशातील राजा न्यूसरे याच्या कालखंडातील हे मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. इटली, पोलंड यांच्या संयुक्त पुरातत्त्व मोहिमेने हा शोध लावला आहे.
सूर्यमंदिर संकुलाचे अवशेष अबुसिर या पुरातत्त्वीय क्षेत्रात सापडले. हे स्थळ इजिप्तच्या इतिहासातील पाचव्या राजवंशातील राजांच्या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध होते.
ही वास्तू आकाराने मोठी नाही. त्याचे क्षेत्रफळ एक हजार चौरसमीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईल नदीच्या गाळाच्या थरांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा भाग झाकला गेला होता.
मंदिराच्या परिसरात मातीची भांडी, काही ग्लास आणि प्राचीन इजिप्शियन खेळ ‘सेनेट’चे लाकडी तुकडेदेखील सापडले आहेत.
उत्खननादरम्यान मंदिराच्या आत दगडांवर कोरलेली धार्मिक दिनदर्शिकादेखील सापडली. मंदिराचे छप्पर तारे आणि ग्रहांच्या अभ्यासासाठी वापरले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘इजिप्तमध्ये केवळ कबरींचे प्रमाण जास्त होते, या आतापर्यंतच्या अभ्यासाला अंदाजे ४५०० वर्षे जुने सूर्यमंदिर आव्हान देणारे आहे,’ असे जगभरातील संशोधकांनी म्हटले आहे.