Sameer Amunekar
गोव्याचे नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक अर्मांडो कुलासो यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. 71 वर्षीय कुलासो स्पोर्ट्स कोचिंगमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे पहिलेच गोमंतकीय ठरले आहेत.
धेंपो स्पोर्टस क्लबचे प्रशिक्षक या नात्याने अर्मांडो कुलासो यांनी राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा विजेतेपद दोनवेळा (२००४-०५, २००६-०७), तर आय-लीग विजेतेपद (२००७-०८, २००९-१०, २०११-१२) तीनवेळा पटकावले.
राष्ट्रीय विजेतेपद एकत्रित पाच वेळा जिंकण्याचा धेंपो क्लब व अर्मांडो यांची कामगिरी भारतीय फुटबॉलमध्ये विक्रमी ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००८ मध्ये धेंपो क्लबने एएफसी कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. अशी किमया साधलेली ते पहिले भारतीय फुटबॉल प्रशिक्षक ठरले होते.
मे 2011 मध्ये अर्मांडो भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. धेंपो क्लबव्यतिरिक्त आर्मांद यांनी गोव्यातील सालसेत फुटबॉल क्लब, सेझा गोवा फुटबॉल क्लब, चर्चिल ब्रदर्स, एफसी बार्देश या संघांचे, तसेच कोलकत्यातील ईस्ट बंगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
प्रशिक्षक या नात्याने आर्मांद यांनी कितीतरी दर्जेदार फुटबॉलपटू घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या महेश गवळी, क्लायमॅक्स लॉरेन्स, सुनील छेत्री. अन्वर अली, अँथनी परेरा, समीर नाईक यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांत सुवर्ण, रौप्यपदक जिंकण्यापर्यंत मजल साधली.
राष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात प्रशिक्षणातील या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले गोमंतकीय प्रशिक्षक ठरले. फुटबॉलमधील त्यांच्या देदीप्यमान योगदानची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.