Manish Jadhav
दिवाळीच्या फराळात आणि गोडधोडामध्ये घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मलाई पेढा कसा बनवायचा याविषयी वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया...
मलाई पेढा बनवण्यासाठी प्रामुख्याने 1 कप मिल्क पावडर, अर्धा कप मलाईदार साजूक दुधावरची मलाई, अर्धा कप दूध, पाव कप पिठीसाखर आणि चिमूटभर वेलची पूड लागते.
एका नॉन-स्टिक कढईमध्ये किंवा पॅनमध्ये पहिल्यांदा दूध आणि साजूक मलाई एकत्र करुन चांगले ढवळून घ्या, जेणेकरुन त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
आता या दुधात हळूहळू मिल्क पावडर टाकत रहा आणि सतत चमच्याने हलवत राहा, जेणेकरुन सर्व मिश्रण एकजीव होईल आणि गुठळ्या होणार नाहीत.
हे मिश्रण मंद आचेवर सतत हलवत राहा. काही वेळातच मिश्रण घट्ट होऊ लागेल आणि कढई सोडायला सुरुवात करेल.
मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. साखर विरघळल्यानंतर मिश्रण थोडे सैल होईल, पण ते पुन्हा घट्ट होईपर्यंत परतून घ्या.
कढई गॅसवरुन खाली उतरवून तयार झालेला गोळा एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर ते हाताने थोडे मऊ करुन घ्या.
आता या तयार गोळ्याचे छोटे-छोटे समान भाग करुन गोल वळवा आणि अंगठ्याने हलके दाबून त्यावर पिस्त्याचे काप किंवा केशर घालून सजवा. दिवाळीत खाण्यासाठी अतिशय चवदार आणि मऊ मलाई पेढा तयार आहे!