Manish Jadhav
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रकिनारा हा त्याच्या शांततेसाठी, स्वच्छतेसाठी आणि हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध आहे. हा किनारा अतिशय शांत असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
किनाऱ्याच्या अगदी जवळच ऐतिहासिक देवगड किल्ला आहे. समुद्राच्या लाटांच्या धडकेने वेढलेला हा किल्ला शिवकालीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असून येथून समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसते.
देवगड हे नाव काढले की डोळ्यांसमोर येतो तो रसाळ 'देवगड हापूस'. या भागातील लाल माती आणि हवामानामुळे येथील आंब्याला जागतिक स्तरावर विशेष मागणी आणि प्रतिष्ठा आहे.
देवगडपासून जवळच असलेले कुणकेश्वर मंदिर हे 'कोकणची काशी' म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे प्राचीन शिवमंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि धार्मिक महत्त्वाची प्रसिद्ध आहे.
देवगडच्या पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या बसवण्यात आल्या आहेत. पवनचक्क्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्त पाहणे हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो.
किल्ल्याच्या परिसरात एक ऐतिहासिक दीपगृह आहे. पर्यटकांना ठराविक वेळेत येथे प्रवेश दिला जातो, जिथून अथांग अरबी समुद्राचा 360-डिग्री व्ह्यू मिळतो.
देवगडमध्ये येणाऱ्या पर्यकांसाठी ताजी मासळी हे मुख्य आकर्षण असते. मालवणी पद्धतीचे पापलेट, सुरमई आणि कोळंबीचे सार चाखण्यासाठी खवय्यांची येथे मोठी गर्दी असते.
अलीकडच्या काळात येथे वॉटर स्पोर्ट्सची सोय करण्यात आली आहे. तसेच, नशीब चांगले असेल तर पहाटेच्या वेळी समुद्रात फेरफटका मारताना डॉल्फिनचे दर्शनही घडू शकते.