Manish Jadhav
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला देवगड बीच हा केवळ त्याच्या अथांग समुद्रकिनाऱ्यासाठीच नाही, तर तिथल्या निसर्गसौंदर्य आणि वैशिष्ट्यांसाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
देवगड बीचच्या एका कड्यावर 1915 मध्ये बांधलेले एक ऐतिहासिक दिपगृह आहे. या दिपगृहाच्या वर जाऊन जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहता, तेव्हा संपूर्ण देवगड शहर, देवगड बंदर आणि अथांग अरबी समुद्राचा विहंगम नजरा डोळ्यात साठवता येतो.
कोकणात समुद्रकिनाऱ्याजवळ पवनचक्क्या पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. देवगड बीचच्या अगदी जवळ असलेल्या पठारावर तीन महाकाय पवनचक्क्या आहेत.
देवगड बीच हा कोकणातील इतर गजबजलेल्या किनाऱ्यांच्या तुलनेत प्रचंड स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त आहे. येथील रुपेरी आणि मऊ वाळूवर चालणे मनाला शांतता देते. तसेच, हा किनारा सुरक्षित समजला जात असल्याने कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे.
या बीचच्या अगदी जवळच समुद्राला वेढा घालून उभा असलेला ऐतिहासिक देवगड किल्ला आहे. 1705 मध्ये कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याची डागडुजी करुन तो अधिक मजबूत केला होता.
देवगड बीचजवळच पर्यटकांसाठी आणखी एक मोठे आकर्षण आहे, ते म्हणजे 'देवगड वॅक्स म्युझियम'. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्तींचे हुबेहूब पुतळे साकारण्यात आले आहेत, जे पर्यटकांना थक्क करतात.
जर तुम्ही नशिबवान असाल, तर देवगड बीचवर बोट सफारी दरम्यान तुम्हाला समुद्रात बागडणारे 'डॉल्फिन' पाहायला मिळू शकतात. याशिवाय, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे स्कुबा डायव्हिंग, जेट स्की आणि बनाना राईड सारखे थ्रिलिंग वॉटर स्पोर्ट्स देखील सुरु झाले आहेत.