Manish Jadhav
देवबागची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील 'संगम'. इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. एका बाजूला संथ वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असे विलोभनीय दृश्य फक्त इथेच पाहायला मिळते.
मालवणमधील इतर किनाऱ्यांच्या तुलनेत देवबागचा किनारा अतिशय स्वच्छ आणि पांढऱ्याशुभ्र वाळूने व्यापलेला आहे. येथील पाणी इतके पारदर्शक आहे की, पाहताच मन प्रसन्न होते.
जर तुम्हाला साहसाची आवड असेल, तर देवबाग बेस्ट आहे! इथे पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की आणि बनाना राईड यांसारख्या अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
देवबागपासून बोटीने काही अंतरावर 'त्सुनामी आयलंड' आहे. भरती आली की हे बेट पाण्याखाली जाते आणि ओहोटीला पुन्हा वर येते. इथे पाण्यामध्ये उभे राहून चहा-नाश्ता करण्याचा अनुभव खूपच युनिक आहे.
देवबागमध्ये पहाटेच्या वेळी डॉल्फिन सफारीचे आयोजन केले जाते. समुद्राच्या लाटांवर उड्या मारणारे डॉल्फिन पाहणे हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो.
येथील होमस्टेमध्ये राहून अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेता येतो. ताजी मासळी, सोलकढी आणि कोकणी पद्धतीचा पाहुणचार हे देवबागचे खास आकर्षण आहे.
कर्ली नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोटीने फिरताना तुम्हाला केरळची आठवण येईल. चहूबाजूंनी नारळ-पोफळीच्या बागा आणि शांत पाणी यामुळे याला 'कोकणचे केरळ' म्हटले जाते.
देवबागचा किनारा गर्दीपासून थोडा दूर असल्याने इथे खूप शांतता असते. संध्याकाळच्या वेळी सोनेरी सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.