Manish Jadhav
चेन्नई सुपर किंग्जचा धाकड कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी मागील काही महिने अत्यंत कठीण गेले. आयपीएलमध्येही त्याला अपेक्षित अशी छाप सोडता आली नाही.
आयपीएलमधील अपयश आणि दुखापतीमुळे राष्ट्रीय संघातही त्याला स्थान मिळाले नाही. तिन्ही फॉरमॅटमधून तो टीम इंडियाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
मात्र, फॉर्ममध्ये परत येण्यासाठी ऋतुराजने बुची बाबू स्पर्धेत भाग घेतला. दुखापतीतून सावरल्यानंतरचा त्याचा हा पहिलाच मोठा सामना होता, पण पहिल्या सामन्यातही तो पूर्णपणे अपयशी ठरला. मात्र, त्याने हार मानली नाही आणि दुसऱ्या सामन्यासाठी कठोर मेहनत घेतली.
स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध खेळताना ऋतुराजने आपल्या जुन्या फॉर्मची झलक दाखवली. त्याने 144 चेंडूंमध्ये 133 धावांची एक तूफानी खेळी खेळली. त्याने आपल्या या खेळीत 10 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावले.
दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऋतुराजने खास विक्रमही केला. एकाच ओव्हरमध्ये त्याने 4 गगनचुंबी षटकार लगावत आपल्या आक्रमक फलंदाजीचा परिचय करुन दिला. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबद्दल आशा निर्माण झाली.
ऋतुराजच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्र संघ मजबूत स्थितीत पोहोचला. त्याच्या दमदार कामगिरीने संघाला एक मोठी धावसंख्या उभारता आली, ज्यामुळे सामना जिंकण्याची शक्यता वाढली. त्याचा हा फॉर्म केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर संघासाठीही महत्त्वाचा ठरला.
हा सामना खेळण्यासोबतच ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2026 ची तयारीही सुरु केली आहे. नुकताच तो चेन्नईमध्ये महेंद्रसिंग धोनीसोबत होता.
बुची बाबू स्पर्धेतील या कामगिरीनंतर ऋतुराजचा आत्मविश्वास परत आला आहे. तो आता हा फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये विशेषतः 'इंडिया ए' संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहे.