Manish Jadhav
ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत बराच काळ चर्चा सुरु होती. अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर, अखेर मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) 141व्या अधिवेशनात क्रिकेटला ऑलिंपिकमध्ये अधिकृत एन्ट्री मिळाली.
2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणार आहे. 1900 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत शेवटचे क्रिकेट खेळले गेले होते.
आज (10 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून ऑलिंपिकमधील क्रिकेटच्या प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत.
1900 मध्ये पॅरिस येथे ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाच पहिल्यांदा क्रिकेटचा त्यात समावेश करण्यात आला. त्यावेळी, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि बेल्जियम या देशांनी त्यांचे क्रिकेट संघ ऑलिंपिकमध्ये पाठवण्यास सहमती दर्शविली होती.
मात्र, ऑलिंपिकचे यजमानपद न मिळाल्याने नेदरलँड्स आणि बेल्जियमने माघार घेत टीम पाठवण्यास नकार दिला होता. एवढचं नाहीतर पुरेशा देशांनी सहभागी होण्यासाठी साइन अप न केल्याने क्रिकेटचा ऑलिंपिकमधील प्रवास कठिण झाला.
ऑलिंपिकमधील एकमेव आणि शेवटचा क्रिकेट सामना ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. हा सामना पॅरिसमधील व्हेलोड्रोम डी व्हिन्सेनेस या सायकलिंग स्टेडियममध्ये खेळला गेला, ज्यामध्ये ब्रिटनने बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
ऑलिंपिक क्रिकेटमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स यांचा 12 सदस्यीय संघ होता. या दोन्ही संघात एक कसोटी सामना खेळला गेला, जो दोन दिवस चालला होता.
ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात चाललेल्या दोन दिवसीय सामन्यात ब्रिटने बाजी मारत 158 धावांनी विजय संपादित केला होता. या सामन्यात फ्रान्सच्या संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र दोनच संघ सहभागी झाल्याने फ्रान्सला पराभूत होऊनही रौप्यपदक दिले गेले.