Manish Jadhav
गनिमी कावा म्हणजे शत्रूच्या मोठ्या फौजेला न घाबरता, आपल्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करुन अचानक हल्ला करणे आणि शत्रू सावध होण्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी परतणे.
महाराजांनी सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांचा आणि घनदाट जंगलांचा पुरेपूर वापर केला. शत्रूला ज्या प्रदेशाची माहिती नाही, अशा ठिकाणी त्यांना खेचून आणणे ही महाराजांची खास शैली होती.
शत्रू विश्रांती घेत असताना किंवा बेसावध असताना त्यांच्यावर वीज कोसळावी तसा हल्ला करणे, हे गनिमी काव्याचे मुख्य वैशिष्ट्य होते. अफजल खान वध आणि शाहिस्तेखानावरील हल्ला ही याची उत्तम उदाहरणे आहेत.
मराठा सैन्य हे अतिशय चपळ आणि हलक्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असायचे. शत्रूची अवजड तोफखाना फौज येईपर्यंत महाराजांचे मावळे डोंगराआड पसार व्हायचे, ज्यामुळे शत्रू चक्रावून जायचा.
शत्रूला चुकीची बातमी पुरवणे, त्यांना चुकीच्या मार्गावर नेणे किंवा वेढा घालून त्यांची रसद तोडणे, यामुळे शत्रूचे मानसिक खच्चीकरण व्हायचे. शत्रू संभ्रमात असतानाच मराठा सैन्य प्रहार करायचे.
गनिमी काव्यामुळे महाराजांनी हजारो मावळ्यांच्या मदतीने लाखोच्या मोगली फौजेचा पराभव केला. संख्याबळापेक्षा बुद्धीबळ आणि नियोजनाला या युद्धतंत्रात सर्वोच्च स्थान होते.
प्रत्येक हल्ल्यानंतर सुरक्षित आश्रय मिळवण्यासाठी महाराजांनी स्वराज्यात अभेद्य किल्ल्यांचे जाळे विणले होते. किल्ला हा केवळ राहण्याचे ठिकाण नसून गनिमी काव्याचा मुख्य आधार होता.
बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील गुप्तहेर खात्याने शत्रूची इत्थंभूत माहिती महाराजांना दिली. तसेच, स्थानिक रयतेच्या सहकार्यामुळे महाराजांना शत्रूच्या प्रत्येक हालचालीची माहिती वेळेत मिळत असे.