Manish Jadhav
छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय युद्धकौशल्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला तब्बल नऊ वर्षे झुंजवत ठेवले. चला तर मग शंभूराजांच्या युद्धनितीचे 8 महत्त्वाचे पैलू जाणून घेऊया..
महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेत 'गनिमी कावा' अधिक आक्रमक केला. शत्रूच्या छावणीवर अचानक हल्ला करणे आणि शत्रू सावध होण्यापूर्वीच डोंगरदऱ्यात गायब होणे, यात त्यांचा हातखंडा होता.
संभाजी महाराजांनी केवळ पायदळच नाही, तर घोडदळ आणि आरमार या तिन्ही विभागांवर आपले नियंत्रण मजबूत केले. जमिनीसोबतच समुद्रातून येणाऱ्या जंजिऱ्याच्या सिद्दीचा आणि पोर्तुगीजांचा त्यांनी कडवा प्रतिकार केला.
शंभूराजांच्या हल्ल्यांचा वेग इतका प्रचंड होता की, शत्रूला विचार करायलाही वेळ मिळत नसे. कमीत कमी सैन्यात जास्तीत जास्त नुकसान कसे करायचे, याची त्यांना अचूक जाण होती.
महाराजांनी कधीही शत्रूशी समोरुन लढण्याऐवजी त्यांच्या रसद पुरवठ्यावर हल्ला करण्याची रणनीती आखली. यामुळे औरंगजेबाचे सैन्य अनेकदा अन्नाविना हवालदिल व्हायचे.
सह्याद्रीचे किल्ले आणि घनदाट जंगले यांचा त्यांनी ढालीसारखा वापर केला. मुघलांच्या अजस्त्र सैन्याला डोंगराळ भागात खेचून आणून तिथे त्यांचा पराभव करणे ही त्यांची प्रमुख चाल होती.
महाराजांचे मोठे यश म्हणजे त्यांनी एकाच वेळी मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी या सर्वांशी लढा दिला. इतक्या आघाड्यांवर लढूनही त्यांनी स्वराज्य सुरक्षित ठेवले.
गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांना संभाजी महाराजांनी पाणी पाजले. रेवदंडा आणि फोंडा येथील लढायांमध्ये महाराजांनी दाखवलेले शौर्य आणि रणनीती आजही लष्करी अभ्यासाचा विषय आहे.
बहिर्जी नाईकांसारख्या निष्ठावान गुप्तहेरांच्या जाळ्यामुळे महाराजांना शत्रूच्या हालचालींची आगाऊ माहिती मिळत असे. शत्रू कोठे तळ ठोकणार आहे आणि त्यांची कमजोरी काय आहे, हे ओळखूनच ते हल्ला करत असत.