Manish Jadhav
शंभूराजांना स्वराज्याचे बाळकडू खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंकडून मिळाले होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी अनेक ग्रंथ लिहून आपल्या बुद्धिमत्तेची आणि स्वराज्य निष्ठेची ओळख करुन दिली होती.
शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याला शंभूराजांनी तब्बल 9 वर्षे झुंजवत ठेवले. स्वराज्य रक्षणार्थ त्यांनी कधीही माघार घेतली नाही.
आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात संभाजी महाराजांनी सुमारे १२० हून अधिक लढाया केल्या आणि विशेष म्हणजे एकाही लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला नाही. हे केवळ स्वराज्यावरील निस्सीम प्रेमामुळे शक्य झाले.
मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्व शत्रूंना त्यांनी एकाच वेळी अंगावर घेतले. "जोपर्यंत शंभूराजे जिवंत आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र जिंकता येणार नाही," याची खात्री त्यांनी औरंगजेबाला पटवून दिली.
शंभूराजांनी दुष्काळात रयतेला मदत केली आणि स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी कठोर कायदे केले. स्वराज्यातील जनतेवर त्यांचे पितृतुल्य प्रेम होते, म्हणूनच रयतेनेही स्वराज्यासाठी प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे पाहिले नाही.
जेव्हा मुघलांनी त्यांना कैद केले, तेव्हा औरंगजेबाने स्वराज्य आणि धर्म सोडण्याची अट घातली. परंतु, "स्वराज्य आणि धर्मासाठी हजार वेळा मरण स्वीकारेन, पण झुकणार नाही," हा त्यांचा बाणा स्वराज्यावरील प्रेमाचा अत्युच्च बिंदू होता.
छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस मरणप्राय यातना सहन केल्या, पण स्वराज्याची गुप्त माहिती शत्रूला दिली नाही. त्यांचे बलिदान हे केवळ वैयक्तिक नव्हते, तर ते स्वराज्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी दिलेले बलिदान होते.
शंभूराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पडली. त्यानंतर प्रत्येक मराठी माणूस पेटून उठला आणि त्यांनी औरंगजेबाचा अवाढव्य मुघल साम्राज्य संपवून स्वराज्याला पुन्हा उभारी दिली.