Manish Jadhav
चाकणचा किल्ला हा एक 'भुईकोट' किल्ला असून याला 'संग्रामदुर्ग' असेही म्हटले जाते. पुणे जिल्ह्यात नाशिक महामार्गावर चाकण शहरात हा किल्ला आहे.
या किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या पराक्रमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी केवळ 300-600 मावळ्यांच्या मदतीने मुघलांच्या बलाढ्य सैन्याला झुंजवले होते.
1660 मध्ये मुघल सरदार शाईस्तेखानाने पुण्यावर स्वारी केली तेव्हा चाकणचा किल्ला जिंकायला त्याला तब्बल 56 दिवस लागले. फिरंगोजी नरसाळा यांनी आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी मुघलांच्या सव्वा लाख फौजेला घाम फोडला होता.
मुघलांनी सुरुंग लावून किल्ल्याचा ईशान्येकडील बुरुज उडवला होता. तटबंदी कोसळल्यानंतरही मावळ्यांनी हार न मानता त्या खिंडारातून आत येणाऱ्या मुघल सैन्याला निकराने रोखून धरले.
जेव्हा फिरंगोजींना किल्ला सोडावा लागला, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. महाराजांनी त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी देऊन त्यांचा गौरव केला.
या किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून सभोवताली संरक्षणासाठी खोल खंदक होते (ज्यात पाणी असायचे) आजही किल्ल्याचे अवशेष आणि प्रवेशद्वार या पराक्रमाची साक्ष देतात.
पुण्यापासून जवळ असल्यामुळे इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. विशेषतः ऐतिहासिक युद्धनीतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी संग्रामदुर्ग हे प्रेरणास्थान आहे.