Rahul sadolikar
वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जाणारा उंट हा आर्टिओडॅक्टिला गणामधील (समखुरी प्राणीगणातील) कॅमेलिडी कुलातील सस्तन प्राणी आहे. त्याच्या दोन जाती आहेत: (1) एक मदारीचा कॅमेलस ड्रोमेडेरियस नावाचा गतिमान अरबी उंट आणि (2) दोन मदारींचा कॅमेलस बॅक्ट्रिअॅनस नावाचा बॅक्ट्रियन उंट.
अरबी उंट सुमारे 5,000 वर्षांपूर्वी अरबस्तानात माणसाळविला गेला असावा, असा एक अंदाज आहे. दोन्ही उंट माणसाळविले गेल्यामुळे रानटी अवस्थेत क्वचितच आढळतात. भारतात प्रामुख्याने अरबी उंट आढळतात.
पूर्ण वाढ झालेल्या अरबी उंटाची खांद्याजवळ उंची सु. 2 मी. तर वजन 650-700 किग्रॅ. असते. तो अंगाने धिप्पाड असून अतिशय काटक व सोशिक प्राणी आहे. तो 150-200 किग्रॅ. वजनाचे ओझे घेऊन रोज किमान 60-80 किमी. प्रवास करू शकतो.
वाळवंटातील परिस्थितीनुसार जुळवून घेताना त्याच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. पायांच्या सांध्यांची लवचिक घडण, कठीण खुराऐवजी रुंद जाड तळवा असलेले लांब पाय व मागील पायांच्या मांड्यांची वेगळी ठेवण ह्यांमुळे उंटाला लांबलांब टांगा टाकून पळता येते जेव्हा तो वेगाने पळतो तेव्हा त्याच्या शरीराच्या एका बाजूच्या दोन्ही पायांची हालचाल अशी होते की, तो डोलत चालल्याचा भास होतो
उंटाची मान लांब असल्यामुळे तोंड उंच करून झाडाचा पाला ते सहज खाऊ शकतात. ते रवंथ करतात. मात्र वर्गीकरणशास्त्रानुसार रवंथी प्राण्यांत त्यांचा समावेश करीत नाहीत. कारण त्यांच्या जठराचे तीन कप्पे असतात व तिसरा कप्पा अवशेषी असतो. वाळवंटात पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तरी वाळवंटातील वनस्पतींपासून मिळालेले पाणी उंटाला पुरेसे होते.
त्याच्या शरीरांतर्गत रचनेमुळे रक्तातील पाण्याची पातळी कायम राखली जाते. याच रचनेमुळे उंट एका वेळी खूप पाणी पितो. हे पाणी त्याच्या जठरात असलेल्या पोकळ्यांमध्ये साठविले जातो. जरूर पडते तेव्हा हे पाणी हळूहळू झिरपून पोटात येते. त्याशिवाय मदारीतील चरबीपासूनही पाणी तयार होत असल्यामुळे उंट पाण्यावाचून काही महिने सहज राहू शकतो.
सुदृढ प्रकृती व शरीराच्या आकारमानानुसार त्याची मदार भरगच्च व वाढलेली असते. त्यात मांस व प्रामुख्याने चरबीयुक्त ऊती असतात. लांबच्या प्रवासात अन्नाशिवाय रहावे लागते तेव्हा या चरबीपासून त्याला ऊर्जा मिळते. म्हणून थकलेल्या किंवा अशक्त उंटाची मदार आकुंचित होऊन पडलेली दिसते.