Manish Jadhav
कोकणातील रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ असलेला भाट्ये समुद्रकिनारा त्याच्या विस्तीर्ण रुप आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथील काळी पांढरी वाळू आणि लांबच लांब पसरलेला किनारा पर्यटकांना मोकळेपणाचा अनुभव देतो.
किनाऱ्याच्या एका बाजूला नारळ आणि सुपारीच्या दाट बागा आहेत. या बागांमुळे किनाऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलते आणि पर्यटकांना फिरताना आल्हाददायक वाटते.
भाट्ये किनारा हा पोहण्यासाठी आणि फिरण्यासाठी सुरक्षित मानला जातो. किनाऱ्याला लागूनच असलेल्या रस्त्यामुळे आणि कमी उंचीच्या लाटांमुळे येथे कुटुंबियांसोबत वेळ घालवणे सोयीचे ठरते.
या किनाऱ्याजवळच कोकण कृषी विद्यापीठाचे प्रसिद्ध 'नारळ संशोधन केंद्र' आहे. येथे नारळाच्या विविध जाती आणि त्यावर होणारे संशोधन पाहायला मिळते, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
मुलांच्या मनोरंजनासाठी येथे घोडागाडी आणि उंट सफारीची सोय उपलब्ध आहे. किनाऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रपेट मारण्याचा आनंद पर्यटक आवर्जून घेतात.
भाट्ये किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सायंकाळच्या वेळी समुद्राच्या लाटा आणि आकाशातील केशरी रंग फोटोग्राफीसाठी उत्तम बॅकड्रॉप तयार करतात.
भाट्ये किनाऱ्याच्या एका बाजूला काजळी नदी समुद्राला मिळते. हा नदी आणि समुद्राचा संगम पाहण्यासारखा असतो. जवळच असलेल्या पुलावरुन या संगमाचे विलोभनीय दृश्य दिसते.
किनाऱ्यावर मिळणारे ओले काजू, कोकम सरबत आणि ताजी मासळी हे पर्यटकांसाठी मेजवानी आहे. तसेच, जवळच असलेल्या कोळीवाड्यामुळे येथे अस्सल कोकणी संस्कृतीचे दर्शन घडते.