Manish Jadhav
या किल्ल्याचा इतिहास इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे. हा किल्ला कोणत्याही राजाने नाही, तर 'भैंसा शाह' नावाच्या एका धाडसी व्यापाऱ्याने आणि 'रोडा चारण' नावाच्या सरदाराने बांधला होता. चोरांपासून आपल्या व्यापारी मालाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हा किल्ला उभारला.
किल्ल्याची निर्मिती करणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या नावावरुन म्हणजेच 'भैंसा शाह' मधील 'भैंसो' आणि 'रोडा चारण' मधील 'रड' एकत्र करुन या किल्ल्याचे नाव 'भैंसोरगड' असे ठेवण्यात आले, जे आजही कायम आहे.
हा किल्ला कालांतराने मेवाडच्या राजांच्या अधिपत्याखाली आला. मेवाडच्या इतिहासात या किल्ल्याला 'अभेद्य दुर्ग' मानले जात असे, कारण चंबळ आणि बामणी या नद्यांमुळे शत्रूला या किल्ल्यावर थेट हल्ला करणे अशक्य असायचे.
13व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने मेवाड मोहिमेदरम्यान या किल्ल्यावर भीषण हल्ला केला. या आक्रमणात खिलजीच्या सैन्याने किल्ल्यातील अनेक प्राचीन हिंदू मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंची मोठी नासधूस केली होती.
16व्या शतकात मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांनी त्यांचे बंधू शक्ती सिंह यांचे वंशज म्हणजेच 'शक्तावत' राजपूत घराण्याला हा किल्ला जहागीर म्हणून दिला. तेव्हापासून हा किल्ला शक्तावत राजपुतांच्या शौर्याचे केंद्र बनला.
ब्रिटिश काळातील प्रसिद्ध इतिहासकार कर्नल जेम्स टॉड जेव्हा राजपुतांचा इतिहास लिहिण्यासाठी येथे आले, तेव्हा या किल्ल्याचा इतिहास आणि भौगोलिक स्थान पाहून इतके भारावून गेले की, त्यांनी याला राजस्थानातील सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम ठिकाण म्हटले होते.
आपल्या शतकांच्या प्रवासात या किल्ल्याने मुघल, राठोड आणि मराठा साम्राज्यांसोबत झालेली अनेक युद्धे पाहिली. परंतु, 2000 फूट उंच सरळ खडकावर असल्याने शत्रूला हा किल्ला कधीही पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवता आला नाही.