Manish Jadhav
आपण अनेकदा बीट वापरतो, पण त्याची साल नको म्हणून ती सरळ कचऱ्यात टाकतो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण बीटच्या गरापेक्षा त्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्वे आणि आरोग्यदायी गुणधर्म अधिक प्रमाणात दडलेले असतात.
बीटच्या सालींमध्ये बेटासायनिन आणि बेटाक्झेन्थिन सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान कमी होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
बीटच्या सालींचा वापर नैसर्गिक रंग म्हणून केला जातो. या साली वाळवून त्याची पावडर लिप बाम किंवा गालांना नैसर्गिक लालसर रंग देण्यासाठी वापरली जाऊ शकते. यामुळे त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक मिळते.
बीटच्या गराप्रमाणेच, त्याच्या सालीमध्येही मोठ्या प्रमाणात फायबर असते. सालीचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.
बीटच्या सालींमध्ये असलेले पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. साली उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांना नैसर्गिक चमक येते आणि ते मऊ होतात. काही अभ्यासांनुसार, यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
बीटच्या सालींमध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रुपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
बीटच्या सालींमध्ये यकृताचे आरोग्य सुधारणारे गुणधर्म असतात. या सालींचे सेवन केल्यास यकृताला डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत मदत मिळते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक प्रभावीपणे बाहेर फेकले जातात.
बीटच्या सालींमध्ये लोह पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यास आणि एकूण शारीरिक कार्ये सुरळीत ठेवण्यास हे घटक मदत करतात.