Manish Jadhav
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेला भूपाळगड हा स्वराज्याच्या दक्षिण सीमेवरील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. संभाजी राजांनी भूपाळगडाच्या मोहीमेत मुघलांची जिरवण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.
इ.स. 1679 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाचा सेनापती दिलेरखान याने भूपाळगडाला वेढा घातला. दिलेरखानासोबत प्रचंड तोफखाना आणि हजारो घोडदळ होते. स्वराज्याचा हा मजबूत किल्ला जिंकून मराठ्यांच्या मनोधैर्याला धक्का लावण्याचा मुघलांचा मुख्य उद्देश होता.
त्याचवेळी, या काळात संभाजी महाराज राजकारणातील काही पेचप्रसंगामुळे दिलेरखानाच्या छावणीत होते. मात्र, तिथे राहूनही त्यांनी स्वराज्याचे हीत जपले. मुघलांच्या हालचालींची गुप्त माहिती त्यांनी मराठ्यांपर्यंत पोहोचवली आणि शत्रूला आतून कमकुवत करण्याची रणनीती आखली.
शंभूराजांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मराठ्यांनी मुघलांची दाणादाण उडवली. भूपाळगडचे रक्षण करण्याची जबाबदारी अनुभवी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्यावर होती. मुघलांच्या तोफांचा मारा सुरु असतानाही फिरंगोजींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गडाचा बुरुज ढासळेपर्यंत निकराची लढत दिली.
भूपाळगडची लढाई ही अतिशय हिंसक आणि रक्तरंजित झाली. मुघलांनी गडाच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा भडिमार केला. अन्नाचा साठा कमी होत असताना आणि रसद तुटलेली असतानाही मराठ्यांनी 'हर हर महादेव'च्या गर्जनेत मुघलांशी समोरासमोर दोन हात केले.
जेव्हा गडाची पडझड झाली, तेव्हा मराठ्यांनी गडावरुन माघार घेण्याचे ठरवले. मात्र, मुघल सैन्याने गडावर प्रवेश केल्यावर 700 मावळ्यांनी आपल्या हाताचे पंजे कापले जाईपर्यंत किंवा प्राणांची आहुती देईपर्यंत लढा दिला.
असे म्हटले जाते की, मुघल छावणीत असतानाही संभाजी महाराजांनी गडावरील मावळ्यांना वाचवण्यासाठी गुप्तपणे प्रयत्न केले. राजांनी दिलेरखानाला चुकीच्या सल्ला देऊन किंवा हल्ल्याची दिशा बदलवून अनेक मावळ्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले, जे त्यांच्या स्वराज्यावरील निष्ठेचे प्रतीक आहे.
भूपाळगड जरी काही काळासाठी मुघलांच्या ताब्यात गेला असला, तरी या लढाईने मुघलांना मराठ्यांच्या शक्तीची जाणीव करुन दिली. संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्यातील गमावलेले किल्ले मिळवण्याचा धडाका लावला आणि मराठ्यांनी हा गड पुन्हा स्वराज्यात आणला.