Manish Jadhav
अकोला जिल्ह्यातील बाळापूर किल्ला हा विदर्भातील ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हा किल्ला मान आणि महीषी या दोन नद्यांच्या संगमावर एका उंच टेकडीवर वसलेला आहे.
या किल्ल्याचे बांधकाम मुघल शैलीत करण्यात आले आहे. किल्ल्याच्या उंच आणि भक्कम भिंती, विशाल बुरुज आणि नक्षीकाम आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
असे म्हटले जाते की, या किल्ल्याचे बांधकाम मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात मिर्झा राजा जयसिंग यांनी सुरु केले होते. किल्ल्याचा वापर प्रामुख्याने लष्करी छावणी म्हणून केला जात असे.
बाळापूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याचे बुरुज अत्यंत भक्कम असून त्यावरुन नद्यांच्या परिसरावर आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे सोपे होते.
किल्ल्याच्या जवळच नदीपात्रात मिर्झा राजा जयसिंग यांनी बांधलेली एक सुंदर 'छत्री' आहे. ही वास्तू पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र असून ती वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते.
मुघल काळात बाळापूर हे दक्षिण भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे केंद्र होते. हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने याला विशेष महत्त्व होते.
अकोला जिल्ह्यापासून अवघ्या 26 किमी अंतरावर असलेला हा किल्ला इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. विशेषतः पावसाळ्यात नद्यांच्या प्रवाहामुळे या किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते.