Manish Jadhav
हरवळे धबधबा हा उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील साखळी गावाजवळ स्थित आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त काहीतरी वेगळे आणि शांत पाहायचे असल्यास हा धबधबा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
या धबधब्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ऐतिहासिक 'हरवळे गुहा' आहे. या गुहा 6व्या शतकातील असून, अज्ञातवासात असताना पांडवांनी येथे आश्रय घेतला होता, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे येथे निसर्गासोबतच इतिहासाचाही अनुभव घेता येतो.
धबधब्याच्या अगदी शेजारीच श्री रुद्रेश्वर देवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या आवारातून धबधब्याचे अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते. महाशिवरात्रीला या मंदिरात आणि धबधब्याच्या परिसरात मोठी जत्रा भरते.
हा धबधबा साधारण 50 मीटर (सुमारे 240 फूट) उंचावरुन खाली कोसळतो. उन्हाळ्यात हा प्रवाह लहान असतो, पण पावसाळ्यात मात्र हा धबधबा पांढराशुभ्र फेसाळत अत्यंत रौद्र आणि विलोभनीय रुप धारण करतो.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि धबधबा जवळून पाहण्यासाठी गोवा सरकारने येथे एक सुंदर 'व्ह्यूईंग गॅलरी' (Viewing Gallery) आणि पूल बनवला आहे. त्यामुळे पर्यटक कोणत्याही धोक्याशिवाय पावसाळ्यातही या धबधब्याचा आनंद घेऊ शकतात.
धबधब्याच्या भोवती हिरवेगार डोंगर आणि सुंदर पार्क विकसित करण्यात आले आहे. यामुळे हा परिसर कुटुंबियांसोबत पिकनिकसाठी आणि फोटोग्राफी किंवा सोशल मीडियासाठी रील बनवण्यासाठी उत्तम स्पॉट ठरतो.
पणजी किंवा मडगाव या दोन्ही मुख्य शहरांमधून या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी गाड्या किंवा बसेसची उत्तम सोय आहे. धबधब्यापर्यंत जाण्याचा रस्ता चांगला असल्याने सर्व वयोगटातील लोक येथे सहज भेट देऊ शकतात.