Pranali Kodre
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनल मेस्सी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
तो गेली अनेक वर्षे 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरतो.
आता मीडियातील रिपोर्ट्सनुसार अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशन त्याचा जर्सी क्रमांक 10 निवृत्त करण्याचा विचार करत आहे.
याबद्दल अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष क्वओडीओ तापिया यांनी अर्जेटाईन वृत्तपत्र मार्साला (Marca) माहिती दिली.
क्वओडीओ तापिया यांनी सांगितले की 'मेस्सी जेव्हा निवृत्त होईल, त्यानंतर आम्ही कोणालाही 10 क्रमांक परिधान करू देणार नाही. 10 क्रमांकाला आम्ही त्याच्या सन्मानार्थ कायमसाठीही निवृत्त करू. एवढे तर आम्ही त्याच्यासाठी करूच शकतो.'
खरंतर यापूर्वीही दिग्गज दियागो मॅरेडोना यांनीही 10 क्रमांकाची जर्सी घातली होती, त्यामुळे याआधीही 2002 वर्ल्डकपपूर्वी अर्जेंटिनाने हा क्रमांक निवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, एका फिफा नियमामुळे त्यांना असे करता आले नव्हते. फिफाच्या त्या नियमानुसार त्या स्पर्धेत संघांनी 1 ते 23 क्रमांक वापरायचे होते. त्यानंतर अर्जेंटिनाकडून एरियल ओर्टेगाने 10 क्रमांकाची जर्सी 2002 वर्ल्डकपमध्ये घातली होती.
दरम्यान मेस्सीने आत्तापर्यंत अर्जेंटिनाकडून 106 गोल केले आहेत. त्याने 2021 कोपा अमेरिका आणि 2022 फिफा वर्ल्डकपही अर्जेंटिनासाठी जिंकला.