Manish Jadhav
अंतूर किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण 2700 फूट उंचीवर आहे.
या किल्ल्याचे नाव 'अंताजी' या मराठा सरदाराच्या नावावरुन 'अंतूर' पडले असे मानले जाते. या किल्ल्याने सातवाहन, यादव, बहामनी आणि प्रामुख्याने मराठा साम्राज्य व मुघलांचा काळ पाहिला.
हा किल्ला तिन्ही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला असून एकाच बाजूने तो डोंगराशी जोडलेला आहे. यामुळे हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत अभेद्य आणि सुरक्षित मानला जात असे.
किल्ल्यावर आजही सुस्थितीत असलेले भव्य प्रवेशद्वार, बुरुज आणि तटबंदी मराठा-मुघल स्थापत्यशैलीची साक्ष देतात. किल्ल्यावरील दगडी कोरीव काम पाहण्यासारखे आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी आणि माथ्यावर धार्मिक श्रद्धास्थाने आहेत. विशेषतः परिसरातील नागरिक किल्ल्यावरील देवस्थानांना श्रद्धेने भेट देतात. किल्ल्यावर कळंबुजा देवीचेही मंदिर आहे.
निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी अंतूर किल्ला हे एक आवडीचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि ढगांची दुलई पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
हा किल्ला गौताळा औट्रमघाट अभयारण्यात येत असल्याने, येथे विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात. किल्ल्यावरून दिसणारा परिसराचा विहंगम नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो.
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्या आजही भरलेल्या असतात, जे त्या काळातील जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.