गोमन्तक डिजिटल टीम
हिंदी सिनेसृष्टीचे बादशाह बिग-बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. आज अमिताभ यांना ८२ वर्ष पूर्ण झाली असून आजही ते अनेकांच्या मनांवर अधिराज्य गाजवत आहेत. आज त्यांच्या जन्मदिनादिवशी त्यांना अनेक शुभेच्छा!!
अमिताभ हे त्यांच्या चित्रपटांशिवाय अपूर्ण आहेत आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण बच्चन साहेबांच्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण हे गोव्यात झालं होतं. १९६९मध्ये आलेला सात हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट आणि या चित्रपटामधून पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या मुक्तीची कथा सांगितली आहे.
या चित्रपटातील अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यांनतर बॉम्बे टू गोवा, या चित्रपटात पणजीतील काही ठिकाणं, मांडावी नदी, तत्कालीन सचिवालयाची इमारत पाहायला मिळते.
द ग्रेट गॅम्बलर आणि राम-बलराम या चित्रपटांमध्ये पणजीत काही भाग तसेच शिकेरीतील जागा पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त में आझाद हूं, शमिताभ हे चित्रपट बनवण्यासाठी अमिताभ बच्चन गोव्यात आले होते.
यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या कभी कभी या चित्रपटाचा क्लायमॅक्स गोव्यात चित्रित करण्यात आलाय. हा चित्रपट करेपर्यंत अभिताभ यांनी सिनेसृष्टीमधे बरंच नाव कमावलं होतं.
नवीन पिढीला माहिती असलेला बच्चन साहेबांचा चित्रपट म्हणजे भूतनाथ, या चित्रपटाचा एक भाग म्हापश्यातील बोडगेश्वर मंदिराच्या समोर चित्रित करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांना गोवा विशेष प्रिय आहे, त्याच्या मते गोव्यात आल्यानंतर मनावरचा ताण कमी होतो. दम्याचा रुग्ण म्हणून मी जेव्हाही गोव्याला जातो तेव्हा माझा दमा नाहीसा होतो. इथली माणसं प्रेमळ आहेत, त्यांना फुटबॉल प्रचंड आवडतो असंही ते म्हणालेत.