Manish Jadhav
अंबोली हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. येथे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो, म्हणूनच या ठिकाणाला महाराष्ट्राचे 'चेरापुंजी' म्हटले जाते. पावसाळ्यात येथील निसर्गाचे रुप अधिकच खुलते.
अनेक धबधब्यांसाठी जंगलात किंवा ट्रेकिंग करत जावे लागते, पण अंबोली धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा मुख्य घाटरस्त्याला लागूनच आहे. त्यामुळे अबालवृद्धांनाही या धबधब्याचा आनंद अगदी सहज घेता येतो.
पावसाळा सुरु झाला की, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून हा धबधबा अत्यंत वेगाने आणि उंचावरुन खाली कोसळतो. डोंगरावरुन फेसाळत येणारे हे पाणी एखाद्या पांढऱ्याशुभ्र दुधाच्या धारेसारखे दिसते, जे पर्यटकांचे डोळे तृप्त करते.
पर्यटकांना धबधब्याच्या मध्यभागापर्यंत जाता यावे आणि पाण्याचा जवळून आनंद घेता यावा, यासाठी प्रशासनाने येथे सिमेंटच्या पायऱ्या आणि रेलिंगची उत्तम सोय केली. त्यामुळे सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेता येतो.
अंबोली धबधब्याभोवती नेहमीच दाट धुके पसरलेले असते. अंगावर येणारे पाण्याचे तुषार, सोसाट्याचा वारा आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार वनराई यामुळे येथील वातावरण प्रचंड थरारक आणि रोमँटिक बनते.
निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धबधब्याचा परिसर सोशल मीडिया प्रेमींसाठी उत्तम केंद्र आहे. येथील नयनरम्य दृश्ये, डोंगरावरील धुके आणि फेसाळणारा धबधबा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक येथे तासनतास गर्दी करतात.
अंबोली धबधब्यासोबतच पर्यटक येथे जवळच असलेल्या कावळे साद पॉईंट (थेट दरीत कोसळणारे उलटे धबधबे), हिरण्यकेशी मंदिराचा उगम आणि नांगरतास धबधब्यालाही भेट देऊ शकतात. विकेंड ट्रिपसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.