Manish Jadhav
महाराजांनी केवळ राज्य मिळवण्याचे स्वप्न पाहिले नाही, तर 'हिंदवी स्वराज्य' हे लोकांचे राज्य असावे हे ध्येय निश्चित केले. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी त्यांनी रायगड राजधानी म्हणून निवडला, जो भौगोलिक आणि संरक्षणात्मकदृष्ट्या सर्वोत्तम होता.
"ज्याची माहिती अचूक, त्याचा विजय निश्चित" हे महाराजांचे सूत्र होते. बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील गुप्तहेर खाते इतके सक्षम होते की, मोहिमेपूर्वी शत्रूच्या गोट्यातील इत्थंभूत माहिती महाराजांकडे असायची.
संसाधने कमी असताना बलाढ्य शत्रूचा पराभव कसा करायचा, हे महाराजांनी जगाला शिकवले. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा वापर करुन शत्रूला आपल्या सोयीच्या ठिकाणी खेचून आणणे आणि अचानक हल्ला करणे, हे त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे लक्षण होते.
महाराजांनी स्वराज्यात 300 हून अधिक किल्ले बांधले किंवा दुरुस्त केले. "गड आला पण सिंह गेला" यावरुन किल्ल्यांचे महत्त्व स्पष्ट होते.
महाराजांनी सर्व अधिकार स्वतःकडे न ठेवता 'अष्टप्रधान मंडळा'ची स्थापना केली. प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी दिली होती (उदा. पेशवा - प्रशासन, अमात्य - वित्त). यामुळे कारभार पारदर्शक आणि गतिमान झाला.
"ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र" ही महाराजांची दूरदृष्टी होती. त्यांनी केवळ जमिनीवरच नव्हे, तर समुद्रावरही वर्चस्व मिळवण्यासाठी स्वतःचे आरमार उभे केले. यामुळेच त्यांना 'भारतीय नौदलाचे जनक' मानले जाते.
स्वराज्याच्या सैन्यात कडक शिस्त होती. शेतीचे नुकसान न करणे, स्त्रियांचा आदर करणे आणि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावणे, हे महाराजांचे आदेश होते. हाच नैतिक पाया स्वराज्याच्या यशाचे गमक ठरला.
महाराजांनी जाती-पातीचा विचार न करता केवळ गुणवत्तेवर माणसांची निवड केली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेधे यांसारख्या विश्वासू सहकाऱ्यांची फळी त्यांनी निर्माण केली, जे स्वराज्यासाठी प्राण द्यायलाही तयार होते.