Manish Jadhav
पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका सुकर करण्यासाठी घोडखिंडीत अफाट शत्रूसैन्याला रोखून धरले. शिवरायांची तोफ विशाळगडावरुन वाजल्याची बातमी मिळेपर्यंत बाजीप्रभूंनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत खिंड लढवून बलिदान दिले.
"आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे" असा ठाम निश्चय करत तानाजींनी शिवरायांच्या एका हाकेवर मोहीम हाती घेतली. कोंढाणा जिंकताना उदयभानूशी तुंबळ युद्ध करुन प्राणांची आहुती दिली; तेव्हा शिवराय भावुक होऊन म्हणाले होते की, "गड आला पण सिंह गेला!"
पन्हाळगडाचा वेढा फोडताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी शिवा काशिद यांनी हुबेहूब शिवरायांची वेशभूषा केली. शत्रूला चकवा देऊन महाराजांना सुरक्षित पुढे जाऊ दिले आणि स्वतः हसत-हसत प्राणांचे बलिदान दिले.
पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांच्या या वीराने दिलेर खानाच्या विशाल सैन्याविरुद्ध ऐतिहासिक लढा दिला. दिलेर खानाने दिलेल्या मनसबदारीच्या प्रलोभनाला धुडकावून लावत त्यांनी महाराज आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडणे पसंत केले.
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाचा मान राखत बहलोल खानावर थेट चाल केली. नेसाडीच्या खिंडीत अवघ्या सात सरदारांसह अथांग सैन्यावर तुटून पडत शिवरायांच्या चरणी आपले प्राण अर्पण केले.
साल्हेरच्या मैदानी युद्धात मोगलांची धूळधाण उडवणारे सूर्यराव काकडे हे शिवरायांच्या सैन्याचे मुख्य आधारस्तंभ होते. महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या स्वप्नासाठी लढता लढता तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण आले.
चाकणचा संग्रामदुर्ग वाचवण्यासाठी शिवरायांचे वीर फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्तेखानाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध 56 दिवस किल्ला लढवला. महाराजांवरील अफाट निष्ठेपोटी त्यांनी प्राणांची पर्वा न करता मोगलांना सळो की पळो करुन सोडले.