Pranali Kodre
साल 2023 संपत आले आहे. अशातच अनेकजण आता वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावाही घेत आहेत.
दरम्यान, या वर्षात भारतीय क्रिकेट संघाने आणि मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक अविस्मरणीय विजय मिळवले, पण असे असले तरी महत्त्वाच्या क्षणी कर्णधार रोहितच्या पदरी निराशाच पडली.
या वर्षात अनेकदा कर्णधार म्हणून रोहितचा स्वप्नभंग झाला.
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफला पोहोचला होता. मात्र दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबईला 62 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचे आणि कर्णधार रोहितचे सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याचे स्वप्न भंगले.
त्यानंतर लगेचच जूनमध्ये कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडला, ज्यात रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत केले. त्यामुळे रोहितचे कर्णधार म्हणून पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.
त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप खेळवण्यात आला, ज्यात रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु अंतिम सामान्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतात विश्वविजेता बनण्याची रोहितची इच्छा अपूर्ण राहिली.
यानंतर डिसेंबर 2023 मध्ये अचानक मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे रोहितचा कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सबरोबरचा कार्यकाळ संपला.
रोहितने 2013 ते 2023 दरम्यान त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले होते.