Pranali Kodre
क्रिकेट या खेळात एखादा फलंदाज एकूण ११ प्रकारे बाद होऊ शकतो. याच 11 प्रकारांबद्दल जाणून घेऊ.
गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या मागे असलेल्या स्टंम्पवरील बेल्स उडवल्या, तर फलंदाज त्रिफळाचीत होतो.
जेव्हा फलंदाजाने शॉट खेळल्यानंतर चेंडू जमीनीला स्पर्श करण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने किंवा यष्टीरक्षकाने तो झेलला, तर फलंदाज झेलबाद होतो.
जर फलंदाजाच्या बॅटला किंवा ग्लव्हजला स्पर्श न करता गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या पॅडला लागला, तर प्रतिस्पर्धी संघाने अपील केल्यानंतर पायचीत बाद दिले जाते, पण त्यासाठी चेंडूची दिशा,टप्पा आणि प्रभाव देखील तपासला जातो.
दोन फलंदाज धाव घेत असताना जर क्षेत्ररक्षकाने ते क्रिजमध्ये पोहचण्यापूर्वीच स्टंप्सवरील बेल्स चेंडूने उडवले, तर फलंदाज धावबाद होऊ शकतो. किंवा नॉन स्ट्रायकर एन्डचा फलंदाज चेंडू पडण्यापूर्वीच क्रिजच्या पुढे गेला, तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो.
जर फलंदाज गोलंदाजाने टाकलेला चेंडू खेळण्यात चूकला आणि क्रिज सोडून पुढे आला, तर त्याला यष्टीरक्षक यष्टीचीत करू शकतो.
जर फलंदाज शॉट खेळताना त्याच्या शरीरामुळे किंवा बॅटमुळे स्टम्पवरील बेल्स उडाल्या, तर फलंदाज हिट विकेट होतो.
जर फलंदाजाने हेतूपूर्वक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या सहमतीशिवाय चेंडू हाताळला, तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.
जर फलंदाजाने हेतूपूर्वक क्षेत्ररक्षक चेंडू पकडत असताना किंवा धावबाद करत असताना अडथळा आणला, तर या प्रकारातही फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.
विकेट गेल्यानंतर किंवा एखादा फलंदाज रिटायर झाल्यानंतर पुढच्या फलंदाजाने 2 मिनिटांच्या आत चेंडू खेळण्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे असते, जर असे झाले नाही, तर त्या फलंदाजाला टाईम आऊट केले जाऊ शकते.
जर फलंदाजाने हेतूपूर्वक गोलंदाजाने टाकलेला चेंडू दोनदा फटकावला, तर त्याला बाद दिले जाऊ शकते. मात्र, जर फलंदाज चेंडू स्टंम्पला लागण्यापासून वाचवत असेल, तर त्याला बाद दिले जात नाही.
जर एखादा फलंदाज पंचांच्या परवानगीशिवाय मैदानातून निघून गेला, तर त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.