India Team recovery session after win against Pakistan:
आशिया कप 2023 स्पर्धेच सुपर फोरची फेरी सुरू झाली असून भारताने पाकिस्तानविरुद्ध राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने विजयाचे सेलिब्रेशनही केले.
बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळलल्यानंतर मंगळवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पूर्ण सामन्यातील आणि त्यानंतर भारतीय संघाच्या रिकव्हरी सेशनमधील काही क्षण दाखवण्यात आले आहेत.
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात राखीव दिवशी विजय मिळवला असल्याने भारताला लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरावे लागले.
भारताचा सुपर फोरमधील दुसरा सामना मंगळवारी कोलंबोमध्येच श्रीलंकेविरुद्ध होत आहे. त्याचमुळे भारतीय संघासाठी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रिकव्हरी सेशन ठेवण्यात आलेले, ज्यात भारतीय संघातील खेळाडू स्विमिंग पूलमध्ये मस्त करताना दिसले.
यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू डान्स करताना दिसत आहेत.
तसेच सामन्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी भारतीय संघाचे उत्साहात स्वागत केले. त्यावेळी सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने केकही कापला. या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) सुरू झाला होता. पण रविवारी पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नव्हता.
दरम्यान या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 2 बाद 356 धावा उभारल्या. भारताकडून केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. तसेच विराटने 94 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी केली.
तसेच सलामीवीर रोहित शर्माने 56 धावा आणि शुभमन गिलने 58 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असताना सामना तिथेच थांबवण्यात आला.
पाकिस्तानकडून फखर जमानने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.