Goa News : कुर्टीत भररस्त्यावर सांडली रेती!
पाळी : राज्यात रेती उत्खनन आणि वाहतुकीला बंदी असली तरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रात्रीच्या वेळेला रेतीची जोरात वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर रेती सांडते आणि या ओल्या रेतीमुळे घसरून दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुर्टीतील रस्त्यावर रेती सांडल्याने शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करून रस्ता धुऊन साफ करावा लागला. मात्र, अवैध वाहतुकीमुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या बंबांचा वापर करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कुर्टीतील सावित्री सभागृहासमोरील रस्त्यावर तसेच खांडेपार येथील पुलावरच रेतीचे ढिगारे सांडल्याने शेवटी लोकांना अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. पोलिसांना फोन करून काही उपयोगाचे नाही, पोलिसच अशा चोरट्या वाहतुकीला अभय देत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कुर्टी भागात रस्त्यावर भर सकाळीच ही रेती सांडली होती. ही रेती ओली असल्याने रात्रीच ती नदीतून काढली असावी असा कयासही नागरिकांनी व्यक्त केला. त्यानंतर या चोरट्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला लोकांनी अडवले, या ट्रकचालकाने रस्त्यावरील रेती साफ करून देतो म्हणून सांगितले, पण शेवटी बराच वेळ झाल्यानंतर अग्निशामक दलाला कळवल्यानंतर दलाच्या जवानांनी पाण्याचा बंब आणून रस्ता साफ केला.
नदीत यांत्रिकी होड्या
रात्री दहानंतर म्हादई आणि झुवारी नदीत रात्रीच्या वेळी यांत्रिकी होड्या चालतात. नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील लोकांना या यांत्रिकी होड्यांचा मोठा आवाज ऐकू येतो, पण कॅप्टन ऑफ पोर्टस् च्या होड्या शोभेच्या वस्तू बनल्याने या रेती माफियांकडे डोळेझाक केली जात आहे. रात्रीच्या वेळी तर गस्तीचे नाटक या खात्याच्या लोकांकडून चालते, त्यामुळे गैरप्रकाराला ऊत आल्याचे नागरिकांनीच सांगितले.
रात्रीच्या वेळेला रेतीची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून कुर्टी भागात भररस्त्यावर सांडलेल्या रेतीमुळे काही दुचाकीस्वारांना अपघात झाले. पण सुदैवाने ते बचावले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब आणून रस्ता साफ केला, अन्यथा आणखी किती अपघात झाले असते, सांगता येत नाही.
- शंकर नाईक, कुर्टी-फोंडा
रेतीवर सध्या कायद्याने बंदी आहे, त्यामुळेच चोरट्या रेतीमुळे रेती माफियांची सध्या चांदी झाली आहे. अव्वाच्या सव्वा दराने सध्या रेती विकली जात आहे आणि गरजवंत ती खरेदी करीत आहे. हा व्यवहार रात्रीच्यावेळीच होतो. त्यामुळे एक तरी रेती व्यवसाय कायदेशीर करा नाही तर अवैध उपसा तरी बंद करा.
- संदीप गरड, तिस्क-उसगाव
अव्वाच्या सव्वा दराने विक्री : बंदी असल्याने सध्या अव्वाच्या सव्वा दराने रेती विकली जात आहे. शहरातील अनेक दुकानात रेतीचे ढिगारे आढळतात. रात्रीच्या वेळी या दुकानांसमोर ही रेती ट्रकातून खाली केली जाते. सध्या रेतीचा दर अडीच ते तीन हजार रुपये मीटर असा घेतला जातो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.