
हिरव्या माळरानांकडे आम्ही ती एक नुसतीच सुंदर जागा म्हणून पाहतो. पण माळरानांकडे त्यापेक्षाही अधिक काही असते. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि अशाच कितीतरी महत्त्वाच्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहतच नाही. 'एक सुंदर जागा' एवढे एकच माळरानांचे वर्णन पुरेसे नाही.
सुर्लाच्या माळरानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेथील लाडफेचा धबधबा आपल्या नजरेसमोर प्रथम येतो. त्या जागेच्या सौंदर्याची चर्चाच लोकांमध्ये अधिक होत असते. पण ती जागा म्हणजे अनेक स्थानिक जीवांचा अधिवास आहे हे देखील आपण लक्षात घ्यायला हवे.
मलबार पीट वायपर, बांबू पीट वायपर, मलबार ग्लायडिंग फ्रॉग, अस्वल (स्लॉथ बेअर) हे तर तिथे आढळतातच पण त्याशिवाय वाघांचा संचारही या भागात आहे. हल्लीच वनखात्यातर्फे वाघाकडून मारल्या गेलेल्या रेड्यासाठी तिथल्या लोकांना भरपाई दिली गेली आहे ही गोष्टच वाघाच्या तिथल्या अस्तित्वाची साक्ष देते.
हा भाग वाघांसाठी एक 'कॉरिडोर' आहे. त्या क्षेत्रातील अस्वलांनीही माणसांवर हल्लाही केला आहे. म्हणजेच हे क्षेत्र पूर्णपणे एक जंगलच आहे. अशा या क्षेत्राचा घाट बांधकामे करण्यासाठी घालणे म्हणजे एक प्रकारे एक क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारण्यासारखे आहे.
आदर्शवत उंचीवर असलेल्या या ठिकाणावरची फुले देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तिथली ऑर्किड्स तर एकमेवाद्वितीय अशीच आहेत. अशा या जागेवर तथाकथित विकासकामे आली तर तिथली जैवविविधता, तिथले निसर्ग सौंदर्य एका झटक्यात नाहीसे होऊन जाईल.
हे सारे सौंदर्य आपल्या भविष्यकालीन पिढीसाठी असेच अबाधित राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या पर्यावरणामुळे वातावरण, पाऊस या साऱ्यांमध्ये एक प्रकारचे संतुलन राहते. पश्चिम घाटातील अशा जागा जर नष्ट झाल्या तर त्याचा परिणाम आम्हांवर थेट होईल यात शंका नाही.
हे जंगल आम्हाला खूप काही देते. अशावेळी आम्हीच जर तिथे जाऊन तिथली झाडे नाहीशी केली, तिथे इमारती उभारल्या, तथाकथित विकास तिथे आणण्याचा प्रयत्न केला तर ते दुर्दैवाचे असेल. खरे तर अशा विकास कामांची याच जागेवर आवश्यकताच नाही. हे एक निर्मळ असे जंगल आहे आणि हे तसेच अस्पर्शीत राहायला हवे. लोकांनी अवश्य या जागेला भेट द्यावी, तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद जरूर घ्यावा पण तिथे बांधकामे उभी करण्याचा विचार करू नयेत.
आर्नोल्ड नोरोन्हा, छायाचित्रकार, निसर्गप्रेमी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.