जरीपटक्याचे सौंदर्यीकरण!

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये एक दिवस राहण्याचा योग आला.
Blog
BlogDainik Gomantak

कमलाकर द. साधले

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये एक दिवस राहण्याचा योग आला. माझ्या मुलाचे रामोजी रावांकडे काही व्यावसायिक काम होते. ते करून आम्ही दोघे पुढे जाणार होतो.

फिल्म सिटीमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी आमची राहायची व्यवस्था केली होती. सकाळची हवा मस्त होती. परिसर रम्य होता. पर्यटकांची रहदारी साडेनऊनंतर. मी अडीच किलोमीटरचा एक फेरफटका मारला.

मी युरोप, सिंगापूरसारखी प्रगतिशील राष्ट्रांतील रस्त्यांचा माहोल पाहिला होता. आपल्या देशांतील रस्ते असे का होऊ शकत नाहीत, याची खंत वाटत होती.

या फिल्मसिटीमधील रस्ते पाहिल्यावर ते कोणत्याही निकषांवर, या प्रगतिशील राष्ट्रांतील निकषांवर जोखल्यासही, त्याहून कमी प्रतीचे नाहीत हा एक सुखद अनुभव होता. स्मार्ट सिटी कशी, असावी याचा एक नमुना. या सिटीचा औरसचौरस आकार आमच्या फोंडा शहराएवढा असावा.

यातील 20-25 कि.मी. रस्त्याच्या कुठल्याही भागातील 3-4मीटर लांबीच्या भागाचा फोटो घ्यावा. डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग, फुटपाथची उंची, तेथील पेव्हिंग, पेव्हिगच्या कडेचे बांधकाम सर्वत्र एकसारखेच आढळेल.

डांबरी रस्त्याला कुठे खड्डा सोडा, खरचटणेही नाही. कुठे पेव्हर टाईलचा कोपरा उडालेला, उचकटलेला नाही. पथदीपांच्या खांबांवर वायरिंगचे जंजाळ नाही. कुठे केरकचरा नाहीच. उचकटलेली जमीन नाही. वृक्ष, झाडेझुडपे, भूपृष्ठावरील गवताळ आच्छादन, सर्व सुंदर निरामय परिसर.

दुपारी जेवणाच्या वेळी या परिसराची आखणी, बांधकाम, डागडुजी, निगराणी करणाऱ्या ज्येष्ठ इंजिनिअरांशी चर्चा झाली. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की यात फार खर्च येतो, बरीच तंत्रसिद्धता लागते, असे काहीही नाही,

मात्र प्रामाणिकपणे आजच्या तंत्रज्ञानाच्या मानकांनुसार कटाक्षाने हे काम केले पाहिजे, कुशलतेने केले पाहिजे. नीट देखभाल, वेळोवेळी दुरुस्ती हे केले तर काम नीटनेटके राहते जास्त टिकते व शेवटी स्वस्त ठरते.

स्मार्ट करणी व स्मार्ट राखणी. ‘उसवलेला एक धागा ताबडतोब नीट केला तर नंतर दहा धागे घालावे लागत नाहीत’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. या नीटनेटक्या रस्त्यांतून, स्वच्छ पदपथांवरून, स्वच्छ परिसरातून चालण्यात जे समाधान मिळते, सुरक्षा लाभते ती मोलाची असते.

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जी उधळपट्टी चालते, कामाच्या दर्जाविषयी काळजी घेतली जात नाही आणि योग्य देखभालीच्या अभावी जी त्याची रया निघून गेलेली असते. हे उद्वेगजनक असते. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय.

पणजी, वास्को व मडगांव यांचा काही भाग सोडला तर बाकी सर्व. शहरीकरण पोर्तुगीज गेल्यानंतरचे. नगरनियोजन खाते आल्यानंतरचे, नगररचनेचे प्लॅन बनल्यानंतरचे. मग रस्त्याच्या कडेच्या इमारती एका रेषेत का नाहीत?

पदपथांची रस्त्यापासूनची उंची एके ठिकाणी १० सेंटीमीटर तर दुसऱ्या ठिकाणी 30-35 सेंटीमीटर. काही ठिकाणी पदपथ रस्त्याहून खाली. मी बऱ्याच परदेशातील चांगल्या शहरात पाहिले.

एका शहरातील एकूण रस्त्यांची लांबी कदाचित शेकडो कि.मी. भरेल. पण सर्वच रस्त्यापासून फुटपाथची उंची सर्वत्र बारा साडेबारा सेंटीमीटरच राहील, फुटपाथ पादचारीस्नेही असल्याने वाहनांच्या मार्गावर कोण चालतच नाहीत. आंधळा माणूससुद्धा शहरात हिंडू शकतो. फुटपाथवरून निर्धास्त चालता येते.

ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग असते तेथे फुटपाथ हलकेच ’खाली दबवून रस्त्याच्या तळावर आणला जातो. आंधळ्याला ही खूण कळते, आणि तो रस्ता ओलांडतो. कारण सिग्नल असो वा नसो माणूस रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूच्या फुटपाथवर चढेपर्यंत रस्त्यावरील वाहने थांबलेली राहतात.

शिस्तीमुळे वाहतूक जलद होते. आपल्याकडे वाहनांच्या मधून कुत्री, गुरे, माणसे वाहनांच्या बरोबरीने, रस्त्यावरून चालतात आणि वाहनांना माणसांच्या,जनावरांच्या गतीने त्यांच्यामधून चालावे लागते! वाहने जास्त काळ रस्त्यावर रेंगाळण्याचे इंधन जास्त जळते.

वायू प्रदूषण वाढते. रस्तेही अपुरे पडतात. ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ हे केवळ नाव देऊन चालत नाही. व्यवस्थापनही ‘स्मार्ट’ असावे लागते.

सक्षम वाहतुकीसाठी रस्त्यांचे प्लॅनिंग किंवा आहे त्या मार्गांचा सक्षम वापर यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे वाहतूक प्रकारांचे विलगीकरण.

वाहनमार्ग व पादचाऱ्यांचे पदपथ ऊर्फ फुटपाथ यांवरील वाहतूक आपापल्या मार्गावरून चालली तर ती जलद होतेच, शिवाय सुरक्षितही. आपले पदपथ स्वच्छ, नेटके नसल्याने पादचारी वाहनमार्गावरून चालू लागतात, वाटेल तेथे रस्ता ओलांडतात. शिस्त, गती व सुरक्षितता या तिन्हीतही बिघाड आणतात.

बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील पावसाच्या पाण्यासाठीचे गटार पदपथाखालून जाते. त्यांवर कॉंक्रीटच्या तयार लाद्या टाकल्या जातात.

बऱ्याचवेळा त्या नीट घातल्या जात नाहीत. खालीवर झाल्या तर टाचा आपटून कोलमडण्याची भीती असते. दोन लाद्यांमध्ये खाच राहिली, एखादी लादीच तुटली किंवा बेपत्ता झाली तर पदपथ अडथळ्यांचा वाटतो आणि पादचारी रस्त्यावरूनच चालणे पसंत करतो.

आणि तीच सवय राहते. काही ठिकाणी नेटका पदपथ असला तरी पादचारी एकदा पदपथावर, एकदा खाली रस्त्यावर असे करीत नाही. हा त्याचा दोष नसून व्यवस्थापनाचा दोष असतो. काही ठिकाणी फुटपाथ विक्रेत्यांनी पदपथ व्यापलेला असतो. त्यांना पर्यायी जागा देऊन पदपथ मोकळे ठेवणे हे व्यवस्थापनाचे काम आहे.

एवढे करूनही पादचारी आपली सवय सोडत नसेल तर वाहनमार्ग न पदपथ यांमध्ये लोखंडी किंवा स्टेनलेस स्टीलचे रेलींग टाकणे आणि रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आहे तेथेच उघडे ठेवणे हा उपाय आहे.

एवढे तपशीलवार लिहिण्याचे कारण म्हणजे शहरी रहदारीचे जेवढे जास्त पादचारीकरण होईल तेवढे रहदारीच्या समस्या कमी, हा नगरनियोजनाचा एक सिद्धांत आहे. सिंगापूरला मी पाहिले आहे पादचारी वाहतूक बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. पण शिस्तबद्ध.

वाहनप्रकारांचे व वाहतूक प्रकारांचे विलगीकरण हाही एक महत्त्वाचा विषय आहे. काही ठिकाणी दुचाकीसाठी वेगळा ट्रॅक ठेवला जातो कारण वाहन लहान असल्याने चारचाकी वाहनांमधून त्यांना डावीकडून उजवीकडून कशीही आपली दुचाकी घुसविण्याची सवय आहे.

ट्रक, टँकर, कंटेनर, जेसीबी यांची धिमी चाल असते. त्यामुळे इतर वाहने त्यांच्यामागे अडकून पडतात. म्हणून या जड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेगळा रस्ता मुक्रर केला जातो.

Blog
Mopa Police Station: पत्र्याच्या शेडमध्ये ‘मोपा पोलिस ठाणे’

आपल्या गोव्यातील खाजगी बसवाले वाट्टेल तेथे बस थांबवून प्रवाशांना आत घेणे किंवा खाली उतरविणे करीत असतात, तोवर मागची वाहतूक अडकून पडते. पार्किंगच्याबाबतीत भलत्या ठिकाणी आपली गाडी पार्क करण्याची सवयच आहे. पुरेशा पार्किंगची सोय नसणे ही अडचण आहेच. तो सोय पुरविणे व भलत्या ठिकाणी पार्क करणाऱ्यांना शिस्त लावणे हे शासनाचे काम.

मूलभूत सोयी व उत्तम प्रशासन हा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा मुख्य कार्यभाग. सौंदर्यीकरण त्यानंतर. भरपूर एफएआर दिला गेल्यामुळे वाळलेली वस्तीची दाटी, देशांतील कुठल्याही शहरांपेक्षा माणशी वाहनांची संख्या जास्त या कारणास्तव गोव्यात रस्त्यांची रुंदी कमी पडत आहे.

Blog
Forest Fire: फक्त गोवाच नव्हे भारतातील 23 राज्यात सुरू आहे आगीचे थैमान; काय आहे कारण?

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध रस्त्यांचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल याविषयी दक्ष राहणे आवश्यक आहे. रस्त्याच्या सात मीटर रुंदीच्या वाहतूक पट्ट्यात एक मीटरचा खड्डा पडला तर वाहतुकीसाठी रस्त्याची परिणामकारक रुंदी (इफेक्टिव्ह विड्थ) कमी झाली. ‘त्या’ एक मीटर खड्याच्या दोन्ही बाजूंनी अर्धा-अर्धा मीटर सुरक्षित अंतर ठेवूनच वाहतूक चालणार. म्हणजे वाहतुकीसाठी परिणामकारक रुंदी दोन मीटरनी कमी झाली.

Blog
Margao Accident: ट्रकच्या धडकेत 73 वर्षीय चुरमुरे विक्रेत्याचा मृत्यू, दांडेवाडी-चिंचणी येथील घटना

सात मीटरचा वाहतूक पट्टा म्हणजे त्यांत साडेतीन मीटरची येणारी लेन व तेवढीच जाणारी लेन. खड्ड्यामुळे येणाऱ्या लेनमधील वाहने खड्ड्याला वळसा घालण्यासाठी जाणाऱ्या लेनमध्ये घुसल्याशिवाय गत्यंतर नसते. येथे गाडीची गती कमी करून दुसऱ्या लेनमधून गाडी पुनः आपल्या लेनमध्ये आणावी लागते नपेक्षा टक्कर होण्याची भीती असते.

युरोपसारख्या शहरांमध्ये असे चालत नाही. नागरिक प्रशासनावर केस गुदरतात. बऱ्याच वर्षांपूर्वीची एक गोष्ट. युरोपमधील एका राष्ट्राच्या राजदूताने दिल्ली प्रशासनावर न्यायालयांत केस दाखल केली.

रस्त्यांतील खड्ड्यांमुळे त्यांच्या गाडीचे ट्युबलेस टायर खराब झाले म्हणून. न्यायालयाने प्रशासनाला त्याची पूर्ण भरपाई द्यायला लावलीच. शिवाय भरपूर कानपिचक्याही दिल्या. नगरवासीयांना निर्दोष सेवा देणे हे प्रशासनाचे कर्तव्यच असते.

Blog
Disaster Management: आपत्तीत तात्काळ मदतीसाठी स्थानिकांना प्रशिक्षण मिळणार!

चांगले नीटनेटके रस्ते, बिन अडथळ्यांचे पदपथ, वक्तशीर बससेवा, स्वच्छ परिसर, स्वच्छ मोकळ्या हवेची क्रीडांगणे, बागा या साधनसुविधा हे शहराची मांडणी आणि देखभाल पुरविणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य. तसेच पाणी, वीज, (यापुढे कदाचित इंधन गॅस) यांचा नियमित पुरवठा होणे आवश्यक आहे.

याशिवाय कचरा-सांडपाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा निचरा या मूलभूत गोष्टींची पूर्तता न करता सौंदर्यीकरणावर वाट्टेल तसे पैसे खर्च करणे हा करदात्यांवर अन्याय आहे.

आमच्या गावची एक बाई हॉंगकॉंगमध्ये बावीस वर्षे राहत होती. ती सांगते बावीस वर्षात पाच मिनिटेसुद्धा घरातील वीजप्रवाह बंद पडला असे झाले नाही. तीच गोष्ट पाणी पुरवठ्याची. आता हॉंगकॉंग चिनी आधिपत्याखाली आहे.

आता काय परिस्थिती आहे, माहीत नाही. पण हॉंगकॉंगचे नागरिक चिनी आधिपत्याखाली जाण्यास नाखूष का होते याचे उत्तर इथे मिळते. खाली लंगोटीच नीट नाही आणि डोक्याला मात्र जरीपटका, हे आपले सौंदर्यीकरण!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com