Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेत जर असा एखादा खेळाडू असेल ज्याच्यावर सर्वांचे लक्ष राहणार असेल तर तो आहे धाकड सलामीवीर यशस्वी जयस्वाल.
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल नंतर जयस्वाल हे असे नाव आहे ज्याच्याकडून मोठ्या या कसोटी मालिकेत शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने कदाचित अद्याप बरेच आंतरराष्ट्रीय सामने खेळले नसतील, परंतु त्याने आतापर्यंत दाखवलेली कामगिरी उत्कृष्ट आहे.
विशेष म्हणजे जयस्वाल पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. जर येथे त्याची बॅट तळपली तर तो मोठा रेकॉर्ड करु शकतो.
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने 19 कसोटी सामन्यांमध्ये 1798 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 52.88 आहे.
यशस्वीने आतापर्यंत 4 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले आहे, ज्यावरुन त्याला या संघाविरुद्ध खेळायला आवडते हे दिसून येते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा रेकॉर्ड शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 26 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. दुसरीकडे, जयस्वालने आतापर्यंत 19 सामने खेळले असून 50 षटकारांचा आकडा गाठण्यासाठी त्याला फक्त 11 षटकारांची आवश्यकता आहे.
जर त्याने येत्या काही सामन्यांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली तर तो आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडेल. जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 षटकार मारणारा खेळाडू बनेल.