Akshata Chhatre
आपल्यापैकी अनेकांना वारंवार अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोटात गॅस किंवा ढेकरा येण्याची समस्या होते. औषधं घेतल्यावर काही काळ आराम मिळतो, पण पुन्हा काही दिवसांत तीच अवस्था होते.
यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपल्या दैनंदिन आहारातील चुका. आयुर्वेदानुसार, शरीरातील पित्तदोष वाढल्यावर अशा समस्या अधिक जाणवतात.
पित्तदोष म्हणजे शरीरातील उष्णतेचा असंतुलित प्रवाह. अशा वेळी काय खावं आणि काय टाळावं हे समजून घेतल्यास आपण ही समस्या सहज कमी करू शकतो.
दही आणि ताक शरीराला थंडावा देतात, पण रात्रीच्या वेळी किंवा जेवणानंतर लगेच खाल्ल्यास अॅसिडिटी वाढवतात. फ्रीजमधून थेट घेतलेलं दही तर अजूनच त्रासदायक ठरू शकतं.
आंबट फळं जसं की संत्रं, मोसंबी, अननस, आंबट कैरी किंवा लिंबाचा रस हे रिकाम्या पोटी घेतल्यास पित्तदोष वाढवतात, ज्यामुळे छातीत जळजळ, आम्लपित्त, पोट फुगणे अशा तक्रारी होतात.
तळलेले पदार्थ, मिरची, हिंग, गरम मसाले यांचा अति वापरही शरीरातील उष्णता वाढवतो आणि अॅसिडिटी वाढवतो. रोज मसालेदार जेवण टाळून दर काही दिवसांनी हलकं जेवण करावं
चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स यातील कॅफिन पित्तदोष वाढवतं, विशेषतः रिकाम्या पोटी घेतल्यास हा त्रास वाढतो. याऐवजी हर्बल चहा, जसं की जिरे-धणे युक्त किंवा हळद-मध असलेला चहा उपयोगी ठरतो.