Pranali Kodre
आशिया चषक 2023 स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहेत. पण त्याआधी भारतीय संघव्यवस्थापनाला काही अनुभवी खेळाडूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे.
आता असे समोर येत आहे की श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोन महत्त्वाचे खेळाडू आशिया चषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही शस्त्रक्रियातून सध्या सावरत आहेत.
श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असून त्याच्या पाठीवर मार्चमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे त्याला आयपीएल 2023 स्पर्धेला आणि कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकावे लागले.
सध्या तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असून त्याच्या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण अजूनही तो पूर्ण बरा झाला नसून त्याला पाठीचा त्रास जाणवत आहे. त्याचमुळे तो आशिया चषकालाही मुकण्याची शक्यता आले.
आयपीएल 2023 स्पर्धेतील 1 मे रोजी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सामन्यात केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता.
आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर लगेचच केएल राहुलच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तोही सध्या या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे.
केएल राहुललाही पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही महिने लागणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोही आगामी आशिया चषकात खेळण्याची शक्यता कमी आहे.