Pranali Kodre
इंग्लंडचा स्टार फलंदाज ऍलेक्स हेल्सने 4 ऑगस्ट 2023 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून इंस्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्ती जाहीर केली.
ऍलेक्स हेल्स टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा जिंकलेल्या इंग्लंड संघाचा भाग होता.
विशेष म्हणजे टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धत झालेला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामना हेल्सचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील देखील अखेरचा सामना ठरला.
हेल्सने निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असून मी देशाचे 156 वेळा प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान आहे. काही आठवणी आणि मैत्री आयुष्याभरासाठी सोबत असतील. पण आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे.'
दरम्यान, 2019 मध्ये हेल्स ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला होता, त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तसेच 2017 साली ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणातही त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली.
पण 2022 मध्ये तब्बल 3 वर्षांनी हेल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण पुनरागमनानंतर तो केवळ आंतरराष्ट्रीय टी20 प्रकारातच खेळला.
त्याने इंग्लंडकडून एकूण 156 सामने खेळले. यात त्याने 11 कसोटी, 70 वनडे आणि 75 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले.
त्याने कसोटीत 5 अर्धशतकांसह 573 धावा केल्या. तसेच त्याने वनडेत 6 शतकांसह 2419 धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2074 धावा केल्या, ज्यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.