Akshata Chhatre
लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील नातं नसून दोन कुटुंबं एकत्र जोडणारा बंध असतो. विशेषतः प्रेमविवाहामध्ये भावना अधिक प्रबळ असतात आणि निर्णय घेताना अनेक वेळा विचार न होता भावनांवरच भर दिला जातो.
परिणामी, अशा नात्यांमध्ये गैरसमज, भांडणं, तणाव आणि काही वेळा घटस्फोटासारखे परिणामही उद्भवतात. अशा प्रेमसंबंधातून जन्माला आलेलं लग्न सुखकर व्हावं, यासाठी संत प्रेमानंद महाराजांनी प्रेमी युगुलांना काही मोलाचे सल्ले दिले आहेत.
ते म्हणतात की केवळ शारीरिक आकर्षण किंवा इच्छा यावर नातं उभारू नये. अशा आधारावर तयार होणारी नाती क्षणिक असतात आणि त्यात प्रेमाची स्थिरता नसते.
महाराज सांगतात की पालकांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह करू नये, कारण लग्नानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये समज आणि सुसंवाद असणं अत्यावश्यक असतं.
ते तरुणांना विवाहपूर्व ब्रह्मचर्य राखण्याचा सल्ला देतात, कारण त्यातून नात्यात पवित्रता आणि आदर टिकतो.
विवाहानंतर पती-पत्नीने जुन्या नात्यांचा उल्लेख टाळावा, कारण अशाने सध्याच्या नात्यात वितुष्ट निर्माण होऊ शकतो.
प्रेम आणि विश्वास ही दोन महत्वाची मूल्यं आयुष्यभर निभावून नेणं गरजेचं आहे.