Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पर्थमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्याच डावात स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशन यांनी द्विशतके झळकावली.
स्मिथने नाबाद २०० धावा केल्या, तर लॅब्यूशनने २०४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४ बाद ५९८ धावांवर डाव घोषित केला. दरम्यान स्मिथने अनेक विक्रमांना गवसणी घालली आहे.
स्मिथने कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये २९ व्यांदा १०० धावांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आता कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत स्मिथ ब्रॅडमन यांच्यासह चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या आहे.
ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंगने सर्वाधिक ४१ कसोटी शतके केली आहेत. तसेच स्टीव वॉने ३२ आणि मॅथ्यू हेडनने ३० कसोटी शतके केली आहेत.
याशिवाय स्मिथने ऑस्ट्रेलियामध्ये ४००० कसोटी धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पूर्ण केला आहे. असे करणारा तो १२ वा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.
तसेच स्मिथने आत्तापर्यंत कसोटीत ४ द्विशतके झळकावली आहेत.
स्मिथने यापूर्वी केलेली तिन्ही द्विशतके इंग्लंडविरुद्ध केली आहेत.