Akshata Chhatre
मुलांचं शिक्षण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा सतत सुरू असतं. शाळेत शिक्षक आणि घरी पालक दोघंही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात.
त्यामुळे पालक-शिक्षक बैठक ही एक महत्त्वाची संधी असते जिथे मुलांची बलस्थानं आणि कमकुवत बाजू यावर चर्चा होऊ शकते.
अशा बैठकीत पालकांनी संयम ठेवून संवाद साधणं आवश्यक असतं.
मुलांना इतरांसमोर रागावणं, शिव्या देणं किंवा त्यांच्या चुका मोठमोठ्याने सांगणं टाळावं. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं.
शिक्षकांशी संवाद साधताना शांतपणे त्यांच्या दृष्टिकोनाची समज घेतली पाहिजे आणि नंतर घरी मुलाशी समजूतदारपणे बोललं पाहिजे.
काही पालक मुलांची अति स्तुती करतात, ज्यामुळे मूल अतिआत्मविश्वासू बनतं. हेही टाळायला हवं. जर मुलाकडून काही चूक झाली असेल तर त्याला योग्य पद्धतीने समजावणं आणि भविष्यात ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.
मुलं त्यांच्या पालक आणि शिक्षकांचा संवाद बारकाईने पाहत असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर आदरयुक्त आणि समजूतदार वर्तन करणं महत्त्वाचं आहे.