Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघ जवळपास एक आठवड्यापूर्वीच इंग्लंडला पोहोचला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाची कसून तयारीही सुरू आहे.
या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासह मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालही घाम गाळताना दिसला आहे.
कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी जयस्वालचा भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जयस्वालची राखीव खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड ऐवजी निवड झाली आहे.
ऋतुराजची यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली होती. मात्र त्याचे 3 जूनला लग्न असल्याने त्याच्याऐवजी जयस्वालला राखीव खेळाडूंमध्ये संधी मिळाली.
त्याचमुळे जयस्वालही भारतीय संघासह इंग्लंडला गेला असून सरावात व्यस्त आहे. या दौऱ्यादरम्यान जयस्वालला भारतीय संघातील अनेक अनुभवी खेळाडूंकडून शिकायला मिळण्याची संधी मिळाली आहे.
जयस्वालची गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून 625 धावा केल्या होत्या.