Pranali Kodre
वर्ल्डकप 2019 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड संघात मँचेस्टरला सामना झाला होता. या सामन्याला आता 4 वर्षे झाली आहेत.
भारत आणि न्यूझीलंड संघात झालेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने राखीव दिवसाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे 9 आणि 10 जुलै 2019 दरम्यान हा सामना झाला.
मँचेस्टरला झालेल्या या सामन्यात भारताला केवळ 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागल्याने या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.
9 जुलैला सुरु झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केलेल्या असताना पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आला.
दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 239 धावा केल्या. पण भारताला 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 49.3 षटकात सर्वबाद 221 धावाच करता आल्या होत्या.
भारताने 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या. तसेच 92 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या.
पण, भारताकडून 7 व्या विकेटसाठी एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी 7 व्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा आशा उंचावल्या होत्या.
मात्र, 48 षटकात जडेजा 77 धावांवर बाद झाला, तसेच धोनी 50 धावांवर असताना मार्टिन गप्टीनच्या डायरेक्ट थ्रोवर धावबाद झाला. त्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या आणि भारतीय संघ सर्वबाद झाला.
या पराभवामुळे भारतीय संघाच्या तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न भंगले.