Pranali Kodre
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात 210 धावांची खेळी केली.
या खेळीसह ईशान वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा जगातील सातवा खेळाडू ठरला. तसेच भारताचा तो चौथा खेळाडू ठरला.
यापूर्वी सर्वात आधी भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने असा कारनामा केलेला. त्याने 24 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियरला नाबाद 200 धावा केल्या होत्या.
त्यानंतर भारताच्याच विरेंद्र सेहवानने 8 डिसेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध इंदोरला झालेल्या वनडेत 219 धावांची खेळी केली होती.
रोहित शर्मा वनडेत द्विशतक करणारा तिसरा खेळाडू ठरला होता, जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये 2 नोव्हेंबर 2013 रोजी 209 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे रोहितने 2013 नंतर 2014 आणि 2017 साली देखील वनडेत द्विशतके करण्याचा कारनामा केला.
रोहितने 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यात झालेल्या वनडेत 264 धावांची खेळी केली. ही खेळी आजही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. त्यानंतर त्याने 13 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंके विरुद्धच मोहाली वनडेत नाबाद 208 धावांची खेळी केली होती.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाद सलामीवीर ख्रिस गेलही या यादीत आहे. त्याने 2015 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेरा येथे 215 धावांची खेळी केली होती.
गेलनंतर 2015 सालच्या वनडे वर्ल्डकपमध्येच न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलनेही द्विशतक करण्याची कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टन येथे नाबाद 237 धावांची खेळी केली.
पाकिस्तानच्या फखर जमानचाही वनडेत द्विशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये समावेश आहे. त्याने 20 जुलै 2018 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे झालेल्या वनडेत नाबाद 210 धावांची खेळी केली होती.