Sameer Amunekar
रायगड जिल्ह्यात आजपासून (२९ सप्टेंबर) साखरचौथीच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा जिल्ह्यात ४२४ ठिकाणी सार्वजनिक, तर ६७० ठिकाणी घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत रायगडमध्ये साखरचौथीचा गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. मुख्य गणेशोत्सवानंतर वद्य चतुर्थीला हा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो.
अलिबाग, पेण, पनवेल, उरण आणि रोहा परिसरात साखरचौथीचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या भागातील विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
साखरचौथीच्या उत्सवाची खास ओळख म्हणजे रस्त्यालगत उभारले जाणारे मोठे सभामंडप, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य सजावट. अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकाही मोठ्या उत्साहात काढल्या जातात.
पेण परिसरातील गणेशमूर्ती कारागिरांसाठी साखरचौथीचा उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जातो. वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त असलेले मूर्तिकार मुख्य गणेशोत्सवात आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करू शकत नाहीत. त्यामुळे वद्य चतुर्थीला ते आपल्या घरी गणपती बसवतात.
पेण परिसरातून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती तयार केल्या जातात. मुख्य गणेशोत्सवासाठी या मूर्ती देशातील विविध भागांसह परदेशातही पाठवल्या जातात. त्यामुळे साखरचौथीचा गणेशोत्सव हा मूर्तिकारांसाठी विशेष भावनिक आणि सामाजिक महत्त्वाचा ठरतो.
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत यंदा ४२४ सार्वजनिक आणि ६७० घरगुती, अशा एकूण १,०९४ साखरचौथीच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार आहेत.