Pranali Kodre
भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग २० ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
दिल्लीत २० ऑक्टोबर १९७८ रोजी सेहवागचा जन्म झाला होता. त्याने सुरुवातीला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
मात्र, नंतर सौरव गांगुलीने कर्णधार असताना त्याला सलामीला फलंदाजीला पाठवले, यानंतर मात्र, सेहवागने दिग्गज सलामीवीर म्हणून नाव कमावले.
सेहवाग भारताकडून कसोटीत २ त्रिशतके करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
त्याने २००४ साली मुल्तानला पाकिस्तानविरुद्ध खेळताना ३०९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा पहिला खेळाडू बनला होता.
त्याने मुल्तानला त्रिशतक केल्याने त्याला मुल्तानचा सुल्तान असे टोपननावही मिळाले. सेहवागने यानंतर २००८ मध्ये चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील दुसरे त्रिशतक केले होते.
सेहवाग त्याच्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळला, ज्यात त्याने २३ शतकांसह ८५८६ धावा केल्या. तसेच ४० विकेट्सही त्याने घेतल्या. त्याने एकदा एका डावात ५ विकेट्स घेण्याचाही कारनामा केला आहे.
सेहवागने २५१ वनडे सामने खेळले असून १५ शतकांसह ८२७३ धावा केल्या आहेत आणि ९६ विकेट्स घेतल्या आहेत. सेगवागने वनडेत २१९ धावांची द्विशतकी खेळीही केली आहे.
याशिवाय सेहवाग आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १९ सामने खेळताना ३९४ धावा केल्या आहेत.
तसेच सेहवागने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब या संघांचे प्रतिनिधित्वही केले आहे. त्याने आयपीएलमध्ये १०४ सामन्यांमध्ये २७२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा समावेश आहे.