Akshata Chhatre
हल्लीच्या काळात नोकर-उद्योगातील अस्थिरता, वाढते खर्च, महागाई, शिक्षण-आरोग्याचे प्रश्न यांसह विविध कारणांमुळे गुंतवणूक करणं, आर्थिक नियोजन करणं प्रत्येकासाठी अपरिहार्य झालं आहे.
गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असताना नेमका कोणता पर्याय निवडायचा? किती काळासाठी, कशी गुंतवणूक करायची? ही आपली गरज ओळखून त्यानुसार अचूकपणे सांगण्याचं काम अर्थ किंवा गुंतवणूक सल्लागार करतात.
आर्थिक सल्लागार होण्यासाठी कोणते विषय निवडावेत? विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी कशी करावी?
आर्थिक सल्लागार हे व्यापक क्षेत्र आहे. त्यात सीए, सीएस, सीएफए, इन्शुरन्स एजंट, पर्सनल ॲडव्हायजर असे अनेक प्रकार असतात. गरजेनुसार विविध प्रकारची कामे या क्षेत्रात त्या-त्या विभागाशी संबंधित तज्ज्ञ मंडळी करत असतात
वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतल्यास मूलभूत संकल्पना पक्क्या होतात. बँकिंगंचही ज्ञान मिळतं. एमबीए, सीए, सीएसची परीक्षा देणं हाही एक पर्याय आहे. बी.कॉम. किंवा एम.कॉम. करता करत असतानाच एखाद्या सीएकडे किंवा त्या प्रकारच्या कार्यालयात तुम्ही काम केलं, तर कामाचा प्रत्यक्ष अनुभवही मिळतो.
वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केल्यावरही ‘सेबी’च्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यानंतर ‘सेबी’कडून परवाना मिळतो आणि मग तुम्ही सल्लागार म्हणून काम करू शकता.
आपल्याकडे आलेल्या ‘क्लाएंट’ची गरज ओळखून त्याला अचूक सल्ला देण्यासाठी सल्लागाराने स्वतःला अपडेट ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी आर्थिक जगतातील बातम्या-लेख वाचणं, तज्ज्ञांच्या मुलाखती किंवा व्याख्याने ऐकणं, तंत्रज्ञानातील बदल समजून घेणं आवश्यक आहे.